कुठे गाडी लावू? उबर की ओला? | धंदा एके धंदा

कुठे गाडी लावू? उबर की ओला? | धंदा एके धंदा

नेमकं फायद्याचं काय आहे? ओलाला गाडी लावावी की उबरला? फुल टाईम ओला-उबरचा धंदा करावा की पार्ट टाईम? लोन काढून गाडी घेऊन ओला-उबरला गाडी लावल्यानं महिन्याला किती कमाई होणार?

रॉकेट सिंग – 2015-16 पासून उबर आणि ओलाची क्रेझ मुंबई-पुणे आणि भारतातल्या इतर शहरांमध्ये वाढली. त्यानंतर अनेकांना उबर आणि ओला या दोन्ही कंपन्या आकर्षित करत होत्या. ओला जास्त फायदेशीर की उबर याच्या चर्चा रंगू लागल्या. गाडी बूक करताना दोन्ही एप्सवर चेक करुन जिथं स्वस्त तिथून कॅब बुक केली जाते. यात ग्राहकांचा फायदाच होतो. पण जर गाडी लावायचा विचार करत असाल, तर नेमकं फायद्याचं काय आहे? ओलाला गाडी लावावी की उबरला? फुल टाईम ओला-उबरचा धंदा करावा की पार्ट टाईम? लोन काढून गाडी घेऊन ओला-उबरला गाडी लावल्यानं महिन्याला किती कमाई होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर साध्या आणि सोप्या भाषेत…

ओला आणि उबरला गाडी लावण्यासाठी काय लागतं?

ओला आणि उबर या दोन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. मुळात या कंपन्या तुम्हाला ग्राहक आणून देतात. त्यासाठी या कंपन्यांसोबत करार करावा लागतो. अनेकदा एक कॅब दोन्ही कंपन्यांसोबत एकाचवेळी काम करते. मुळात या कंपन्यांना गाडी लावण्यासाठी काय कागदपत्र आणि कोणकोणत्या गोष्टी लागतात, हे आधी समजून घ्या.

-5 वर्षांपेक्षा कमी जुनी कार ज्यात AC सुरु असणं बंधनकारक
-कमरशिअर ड्रायविंग लायसन्स
-गाडीचं परमिट
-गाडीचे इन्शुरन्स पेपर
-टॅक्स रिसिप्ट
-आरसी बूक
-बँक डिपॉझिटसाठी कॅन्सल चेक
-घरचा पत्ता
-जो गाडी चालवणार आहे, त्याचाही पत्ता

वरील कागदपत्र असतील तर आठवड्याच्या आत ओला आणि उबरसोबत करार करुन तुम्ही कामाला लागू शकता. पण नेमकं दोघांपैकी कुणासोबत धंदा करावा? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी नेमका फायदा जास्त कोण करुन देतं, हे जाणून घेणं गरजेचंय. ओला आणि उबर यांचा पैसे देण्याचा प्लान, ज्याला पेआऊट प्लान असं म्हटलं जातं, तो साधारणपणे सारखाच आहे. यात वेळोवेळी थोडेफार बदलही केले जातात. त्यामुळे याचा अंदाजे असलेला बेसिक प्लान समजून घ्यायला हवा.

किती ट्रीप केल्या तर किती किती पैसे?
5 ट्रीप – 2,000 रुपये
7 ट्रीप – 2,700 रुपये
10 ट्रीप – 4 हजार
14 ट्रीप – 6 हजार

यात इतर खर्च जसं की पेट्रोल, टोल वगैरे मालकाला भरावा लागतो. वर दिलेल्या पैशांमध्ये कराची रक्कमही जोडली गेलेली नाही. महिन्याचा हिशोब केला तर नेमके किती पैसे होतात, याचाही हिशोब करुन बघुयात. उदाहरणार्थ, जर दिवसाला खूप मेहनत करुन तुम्ही 10 ट्रीप पूर्ण केल्या, तर तुम्हाला 4 हजार रुपये दरदिवशी मिळतील. एकही दिवस सुट्टी न घेता महिन्याचे 30 दिवस गाडी चालवली तर किती रुपये होतात त्याचंही गणित करुन पाहू..

महिन्याचे दिवस X दर दिवसाची कमाई = महिन्याची एकूण कमाई
30 X 4000 = 1,20,000 रुपये

उबरचा टॅक्स आहे 25%. तो यातून वजा केला 1 लाख 20 हजाराचे 25 टक्के होतात 30 हजार. ते वजा केल्यास रक्कम शिल्लक राहते 90 हजार. आता महिन्याचं उत्पन्न 90 हजार आहे, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चुकताय. कारण यामध्ये दिवसाचा खर्च आपण जोडलेला नाही. दिवसाचा गाडीचा खर्च हजार रुपये पकडला तर साधारण महिन्याचा खर्च आणि 30 हजार रुपये आपल्याला वजा करावा लागेल. यात पेट्रोल, टोल, ड्रायवर यांसारखा खर्च मोडतो. असा 30 हजाराचा खर्च वजा केल्यास उतरतात 60 हजार रुपये. वर उल्लेखलेल्या हिशोबाचं सोपं गणित..

महिन्याची एकूण कमाई – 25% उबरचा कर = शिल्लक रक्कम
1,20,000 – 25% (30,000) = 90,000

शिल्लक रक्कम – गाडीचा महिन्याचा खर्च = एकूण शिल्लक रक्कम
90,000 – 30,000 = 60,000

आता एकूण शिल्लक रक्कम 60 हजार जी उरली आहे, ती तुमची नेट कमाई (NET INCOME) आहे असं जर तुम्हाला वाटेल. पण मुळात असं नाही. असं कसं, हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. त्याचंही उत्तर पुढील हिशोबातून लक्षात येईल.

दिवसाला जर तुम्ही 10 ट्रीप करत असाल आणि एक ट्रीप सरासरी 15 किलोमीटरची असेल असं आपण गृहीत धरु. तर याप्रमाणे दिवसाला तुम्ही 150 किलोमीटर गाडी चालवता. म्हणजेच तुम्ही 30 दिवसांत 4 हजार 500 किलोमीटर तुमची गाडी चाललेली असेल. याच गणिताप्रमाणे एका वर्षाचा हिशोब केला तर तुम्ही 54 हजार किलोमीटर गाडी चालवली असेल. दोन वर्षातच तुमची गाडी 1 लाखापेक्षा जास्त किलोमीटर चाललेली असेल. 1 लाखापेक्षा जास्त गाडी चालली की गाडीची डेप्रिसिएशन व्हॅल्यू अर्धी होऊन जाते. म्हणजे जर तुम्ही 5 किंवा 6 लाखात कार खरेदी केली असेल, तर दोन वर्षातच त्या गाडीची किंमत अर्ध्यापेक्षा कमी होऊन जाणार.

उदाहरण म्हणून आपण 6 लाखाची गाडी आहे असं समजू. दोन वर्ष ओला किंवा उबरला गाडी तुम्ही चालवली. दोन वर्षात तुमची गाडी 1 लाख किलोमीटर चालली, असं पकडलं, तर दर 10 हजार किलोमीटरनंतर तुम्हाला गाडीची सर्विसिंग करणं भाग आहे. दर महिन्याची सर्विस कॉस्ट 5 हजार रुपये पकडली, तर वर्षाचे होतात 60 हजार रुपये. आणि दोन वर्षांचे होतात 1 लाख 20 हजार रुपये.

2 वर्ष 1 लाख किंवा पेक्षा जास्त किलोमीटर गाडी चालवल्यामुळे 6 लाखाच्या गाडीची वॅल्यू अर्धी होऊन झाली = 3,00,000 लाख रुपये
2 वर्षाचा गाडीचा सर्विसिंगचा खर्च = 1,20,000 हजार रुपये

वरच्या दोघांचीही बेरीज केली = एकूण रक्कम
3,00,000 + 1,20,000 = 4,20,000 रुपये

आता या एकूण रकमेला वर्षाच्या दोन वर्षातून भागल्यानंतर आपल्याला मिळेल, दर महिन्याचा खर्च. दोन वर्षांचे होतात 24 महिने. म्हणजे प्रत्येक महिन्याचा खर्च किती त्याचं गणित करुया..

एकूण रक्कम / 24 महिने = प्रत्येक महिन्याचा छुपा खर्च
4.20 लाख/ 24 महिने = 17,500 रुपये

17,500 रुपये आहे हिडन कॉस्ट. ही हिडन कॉस्ट आपण जेव्हा 60 हजार रुपयांतून वजा करु त्यानंतर आपल्याला मिळेल नेट इनकम.
60,000 – 17,500 = 42,500 रुपये (NET INCOME)

तर ओला उबर चालवणाऱ्या माणसाचं नेट इनकम झालं 42 हजार 500 रुपये. त्यातही जर गाडी लोनवर घेतली असेल, तर कर्जाचा हप्ता यातून आणखी वजा होईल. आणि मूळ हातात महिन्याला येणारी रक्कम 40 हजारपेक्षाही कमी असेल. अशावेळी ओलाला गाडी लावावी की उबरला हेदेखील समजून घ्यावं लागेल.

ओला आणि उबरमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. ओला कंपनी उबरपेक्षा दोन वर्ष जुनी आहे. उबर सुरुवातीपासूनच जागतिक बाजारात उतरली होती. ओला गेल्या दोन वर्षात भारतासोबत परदेशातही उतरली आहे. ओलाच्या तुलनेत उबरही मोठी कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांनी हाय प्रॉफिट देण्याचा दावा करत अनेक टॅक्सी चालवणाऱ्यांना आकर्षित केलं होतं. दोन-अडीच वर्षांपूर्वी त्यामुळे अनेकजण नोकरी सोडून या धंद्यात उतरले. सुरुवातीला काही जणांनी तर महिन्याला 90 ते 95 हजार रुपये महिना कमाईसुद्धा केली. पण आता तितकी कमाई ओलामध्येही होत नाही आणि उबरमध्येही होत नाही. अनेक ड्रायव्हर पार्टनर्स ओला आणि उबर सोडत आहेत, हे वास्तव आहे.

ओला आणि उबरने आपल्या कमिशनमध्ये वाढ केली आहे. तसंच ड्रायवर फीसुद्धा वाढवली आहे. त्यामुळे ओला आणि उबरच्या वेटींग टाईममध्येही वाढ झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे ड्रायव्हर पार्टनरला तर आता फक्त 30 टक्के कमाई मिळते. त्यातही दिवसाला 10 ट्रीप करण्यासाठी कधी कधी 12 ते 15 तास काम करावं लागतं. जे अनेकांना जवळपास अशक्य गोष्ट वाटते. मोठ्या संख्येनं लोकं उबर आणि ओलाच्या धंद्यात उतरल्यानं स्पर्धाही प्रचंड वाढली. ज्यामुळे ओला-उबरमध्ये एक प्रकारचं सॅच्युरेशन आलं.

मुळात ओला आणि उबर या दोन्ही कंपन्या अजिबात फायद्यात नाही. 2016 साली 90 टक्के GROWTH झालेल्या या दोन्ही कंपन्यांची केल्या काही वर्षात चांगलीत वाताहत झाली आहे. 2017-18मध्ये या कंपन्यांचा धंदा 20 टक्क्यांवर आला होता. 2019मध्ये तर हा धंदा 4 टक्क्यांवर आल्याची आकडेवारी समोर आली आहे. नोकरी सोडून जे लोक 2017-18 साली 60 ते 70 हजार रुपये महिन्याला ओला-उबरला गाडी लावून कमवत होते, त्यांची कमाई 24 हजार रुपयांपर्यंत खाली आल्याचं अनेकजण सांगतात.

एवढं सगळं वाचल्यानंतरही जर तुम्ही ओला-उबरला गाडी लावण्याचा विचार करत असाल तर दोन गोष्टी ध्यानात घ्यायला हव्यात. जर तुम्ही ओला-उबरला गाडी लावून ड्रायवर ठेवणार असाल, तर धंदा चालण्याऐवजी बसण्याचीच शक्यता जास्त आहे. जर पार्ट टाईम म्हणून तुम्ही स्वतः ओला-उबरसाठी गाडी चालवणार असाल, तर मात्र यात बरी कमाई होते, असं अनेक ड्रायव्हर्स सांगतात. त्यातही ओलाही भावेश अग्रवाल या भारतीय तरुणानं सुरु केलेली कंपनी आहे. उबरच्या तुलनेत ओलाचं पेआऊट जास्त चांगलं आहे, असाही अनेक ड्रायव्हर्सचा अनुभव आहे. मार्केट रिसर्च केल्याशिवाय कुठे गाडी लावावी, याचा निर्णय घेऊ नका. विशेष म्हणजे धंदा करणं म्हणजे एक प्रकारची रिस्क आहेच. आणि ज्यात रिस्क नाही, असा कुठला धंदाच नाही.

हेही वाचा – 2 वर्षांचा असताना वडील गेले, पेन्शनवर शिकला, आज करोडोत खेळतोय
हेही वाचा – इन्फोसिसची नोकरी सोडली आणि पाणीपुरी विकून कमाल केली
हेही वाचा – गुगलची नोकरी सोडून, त्याने पैसेही कमावले आणि नावही
हेही वाचा – खूप श्रीमंत.. खूप खूप श्रीमंत.. आणि मग येतात नाना शंकरशेठ

हेही इंटरेस्टिंग आहे...

घर खरेदी करणं चांगलं की भाड्यानं राहणं चांगलं?

घर खरेदी करणं चांगलं की भाड्यानं राहणं चांगलं?

सिंगल स्क्रीनवरुन फोन स्क्रीनवर कशी आली ऍडल्ट फिल्म?

सिंगल स्क्रीनवरुन फोन स्क्रीनवर कशी आली ऍडल्ट फिल्म?

मोदीविरोधी Official PeeingHuman जन्माला कसं आलं?

मोदीविरोधी Official PeeingHuman जन्माला कसं आलं?

No Comment

Leave a Reply