भाजप समर्थक तुमचंही ऐकून घेत नाहीत? मग हे वाचाच…

भाजप समर्थक तुमचंही ऐकून घेत नाहीत? मग हे वाचाच…

सोशल मीडियावर राजकीय चर्चा जोरात रंगतात. हल्ली त्यांचं प्रमाण इतकं विखारी होत चाललं आहे की त्यावरुन पोलिस तक्रारी आणि गुन्हेही नोंदवल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. त्यातच पेड ट्रोल्स, अशी एक जमातही अस्तित्वात असल्याचे दावे केले अशात. मात्र सोशल मीडियावरुच्या प्रामुख्याने होणाऱ्या प्रो भाजप आणि एन्टी भाजप या चर्चेतून नेमकं काय घ्यायचं, काय नाही घ्यायचं हे सुद्धा अनेकांना कळत नाही. अशातच एक पत्र सध्या सोशल मीडियावर गाजतंय. प्रो भाजप सर्मथक वादविवाद करताना मुद्दा सोडून विषय कसा भरकटवतात, यावर प्रकाश टाकणारी एक पोस्ट फेसबूक, व्हॉट्सअपवर फिरतेय. त्या पोस्टचा कंटेट.. जसा आहे तसा beingreader.comच्या वाचकांसाठी…

ते २०१३ ला पेट्रोलच्या भाववाढीला वैतागलेले एक पुणेकर काका स्कूटर ढकलत ढकलत पंपावर जातात. तेथे पंपावरचा कर्मचारी त्यांना किती पेट्रोल भरायच विचारतो तेव्हा वैतागलेले काका खास पुणेरी शैलीत “पाच रुपयाचं शिंपड! शिंचा स्कूटरवर म्हणजे पेटवून देतो!” म्हणतात. त्यावेळी हे काका प्रत्येक गृपमधे स्कूटर ढकलत होते.

२०१४ ला देशात सत्तांतर झाले आणि काकांच्या आवडत्या पक्षाचे सरकार देशात स्थापन झाले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या पण देशात पेट्रोल डिझेलचा भाव सतत चढेच राहिले. भाववाढीने नवनवीन उच्चांक गाठले, पण काका आता स्कूटर ढकलत कुठल्याच गृपमधे फिरत नाहीत.

आता जर कोणी काकांना विचारलं की, काका पेट्रोलचे भाव खूप वाढलेत हो; तर काका जाम भडकतात “लेको तुम्हाला सगळं फुकट पाहिजे. ७० वर्षात तुम्हाला फक्त फुकटाची सवय लावून पंगू केलय. तुम्हाला विकास पाहिजे पण कर भरायला नको. आयतखाऊ कुठले!
फक्त पेट्रोल डिझेल भाववाढीवरच नाहीतर सर्वच समस्यांवर आता काकांनी आता सॉलीड यु टर्न घेतला आहे.

पूर्वी कांदा महाग झाला, गँसचे भाववाढ झाले की, त्वेषाने रस्त्यावर उतरून सरकारचा राजीनामा मागणारे काका आता भाववाढीचा निषेध करणाऱ्यांना “आयतखाऊ, फुकटे” अशी ठेवणीतली शेलकी विशेषण देतात. एवढेच नाहीतर पूर्वी शेतीशी काहीही संबंध नसणारे काका सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी म्हणून आंदोलनात भाग घेत; पण जेव्हा काकांचा लाडका नेता मुख्यमंत्री झाला तेव्हा शेतकऱ्यांनी कर्जमाफी साठी मोर्चे काढले तेव्हा काकांचा सात्वीक(?) संताप अनावर झाला आणि ते शेतकऱ्यांना “चोर, फुकटे, कर्जबुडवे, कर भरणा-यांच्या पैशावर मजा मारणारे” अशी विशेषणे देऊन मोकळे झाले.

एवढेच नाहीतर तेव्हा जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या येत तेव्हा काका या आत्महत्या नसून सरकारने केलेले खून आहेत पाप लागेल पाप म्हणून ओरडायचे. आता जर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय निघाला तर ऊसळून येतात “देशातला शेतकरी आळशी झालेला आहे, शेती नीट करायला नको, एपत नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी लग्नाकार्यात खर्च करतो, व्यसने करतो दारु पितो आणि मग पळपुट्यासारखी आत्महत्या करतो.” असा आरोप करतात.

बरं काकांचा आवडता पक्ष सत्तेवर आल्यानंतर देशाची खूप भरभराट झाली असे काही नाही. उलटपक्षी आत्मघातकी एककल्ली निर्णयांमुळे आर्थिक पाया खिळखिळा झाला. औद्योगिक क्षेत्र अडचणीत आले, रोजगाराची समस्या उग्र झाली; पण काका ते मान्य करीत नाहीत. कारण त्यांच्याकडे तेवढा प्रामाणिकपणा नाही.

पूर्वी डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला की काका बच्चनच्या स्टाईलमधे “रुपया उसी देश का गिरता है जिसका प्रधानमंत्री गिरा होता है।” असे डॉयलॉग मारायचे. आता ते रुपया घसरण्याचा संबंध जागतिक बाजारपेठेशी जोडतात.

पूर्वी सरकारने एखाद्या क्षेत्राचे खाजगीकरण करायचा निर्णय घेतल्यास काका त्या क्षेत्रातील कामगारांच्या भवितव्यासाठी जीव तोडून आंदोलन करायचे. हे सरकार देश विकणार म्हणून बोंब मारायचे, पण काकांचा लाडका नेता पंतप्रधान झाल्यानंतर त्याने सरकारी कंपन्या विकायचा सपाटा चालू केला तेव्हा काका म्हणाले “बरोबरच आहे, सरकारी पैशाचा चुराडा होतोय नुसता, फक्त खुर्च्या गरम करून वेतन आयोग पाहिजेत शिंच्यांना, कामे तर कवडीची करीत नाहीत, खाजगी मालकाच्या ताब्यात गेल्याशिवाय वठणीवर येणार नाहीत लेकाचे.”
सरकार बदलले तेव्हा देशासमोर महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या तीन प्रमुख समस्या होत्या त्या आता अधिकच भीषण झाल्या. काकांचा नेता सगळ्या आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरला; पण वादविवाद सुरू झाला की, काका या मुद्द्यांवर बोलतच नाहीत… ते राममंदिर ३७० कलम, पाकिस्तान, सर्जिकल स्ट्राईक यावर भर देतात. वाद घालणारा सामान्य बुद्धीचा असेल तर त्याला गार करून टाकतात, आणि तो वरचढ असेल तर सात्त्विक (?) संतापाने त्याला देशद्रोही ठरवून तुमच्या सारख्या गद्दारांशी काय बोलायचे म्हणून काढता पाय घेतात.

मित्रांनो, असे असंख्य काका तुमच्या आमच्या भोवती वावरत आहेत, जे देशाची आर्थिक परिस्थिती, महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी यावर स्वतःचे पूर्वीचे मत बदलून फिरतात. या सगळ्यांचे पूर्वी मत होते की “सर्व सरकारने केले पाहिजे ती सरकारची जबाबदारी आहे”. आता ते बोलतात “जनतेची काही जबाबदारी आहे की नाही?”

तुम्ही त्यांना परराष्ट्र धोरण, शेजाऱ्यांशी बिघडलेले संबंध महागाई बेरोजगारी कशाबद्दलही विचारा… ते उत्तर देणारच नाहीत. कारण त्यांच्याकडे उत्तरच नाही. तुम्ही त्यांना हे प्रश्न विचारले की, ते राहूल गांधी कसा पप्पू आहे, सोनिया गांधींचे लग्नाआधी नाव काय होते, आणि त्या काय काम करीत होत्या, फिरोज गांधी हा फिरोज खान कसा होता, जवाहरलाल नेहरू कसे अय्याश होते हे सगळे सांगत बसतात; ज्याचा खरे तर आजच्या परिस्थितीशी काहीही संबंध नाही. पण काहीही झाले की नेहरूने वाटोळे करून ठेवले होsss, ही एकच पळवाट काकांकडे आहे.

एवढेच कशाला अगदी परवा चीनने घुसखोरी केली तरी काकांनी टाहो फोडला, “नेहरूंच्या पापाचे फळ भोगतोय हो आपण दुसरे काही नाही.”

मित्रांनो, मी कॉंग्रेसचा समर्थक किंवा मतदार नाही; पण प्रत्येकाला त्याच्या कामाचे श्रेय दिले पाहिजे, अन्यथा तो अन्याय होईल. *४० कोटी लोकसंख्येचा प्रचंड गरीबी असलेला आणि साधनसंपत्तीची वानवा असलेला देश नेहरुंनी चालवायला घेतला, आणि त्याचा कायापालट केला. विद्यापीठे, विमानतळे, औद्योगिक कंपन्या, महामार्गाची निर्मिती करून देशाला आधुनिकीकरणाकडे नेले. देशातील धनदांडग्यांशी “पंगा” घेऊन इंदिराजींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले म्हणून आज आपण आपली संपत्ती बँकेत ठेवून निर्धास्त झोपतो. पारंपरिक शत्रूचे दोन तुकडे करून बांगलादेशाची निर्मिती केली; आणि त्याला कायमचे नामोहरम केले. काकांच्या पक्षाचा विरोध पत्करुन राजिव गांधींनी संगणीकरणाला देशात चालना दिली. (या निर्णयासाठी दिवंगत प्रमोद महाजन यांनी जनतेचा रोजगार गिळणारा “राक्षस” ही पदवी राजिव गांधींना दिली होती.) ज्याचा परिणाम म्हणून आज देशात शेकडो आयटी हब आहेत, जगातले कितीतरी देश त्यांच्या कामाचे आऊटसोर्सिंग भारताकडून करुन घेतात. लाखो लोक या क्षेत्रात रोजगार कमावतात. वाढती लोकसंख्या आणि देशातील उलाढाल यांचा मेळ बसेना तेव्हा प्रचंड विरोध पत्करुन नरसींह रावांनी खुले व्यापारी धोरण अंगिकारले, आणि देशाने नवीन घोडदौड सुरु केली. २००८ ला अमेरिकेतील “लिमन ब्रदर्स” कोसळले तेव्हा त्या धक्क्याने जगातील सगळे देश हादरले, काही तर भिकेला लागले पण त्या आणिबाणीच्या क्षणी आपले अर्थशास्त्रातील सर्व ज्ञान पणाला लावून आपल्या वृद्ध छातीचा कोट करून मनमोहनसींग यांनी देश सावरला व आपण सुरक्षित राहीलो.

हे सगळे सांगायचे कारण आपण हे सर्व विसरत चाललो नसून खोट्यानाट्या पोष्ट फिरवून या सर्वांची बदनामी करुन आपल्याला हे सर्व विसरायला लावले जात आहे.

मित्रांनो, तुम्ही फक्त एवढाच विचार करा १३५ डॉलरला कच्च्या तेलाचा एक पिंप मिळत असताना ६५ रुपये लिटरचे पेट्रोल स्कूटरमध्ये टाकताना जे स्कूटर पेटवून द्यायची भाषा बोलत होते ते आज ४०-४५ डॉलराला एक पिंप मिळत असताना ८५ रुपये लिटरचे पेट्रोल आनंदाने स्कूटरमधे टाकतात आणि “मेरा देश बदल रहा है… आगे बढ रहा है।” म्हणतात, यातच सर्व काही आले. कारण काकांना तेव्हा वाढती महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या याची चिंता नव्हती त्यांना फक्त त्यांच्या पक्षाला सत्तेवर आणायचे होते.

मुद्दे पटले असतील जास्तीतजास्त शेयर करा. ही पोष्ट शेयर केल्यानंतर तुम्हाला एकाही प्रश्नाचे समर्पक उत्तर मिळणार नाही याची मला खात्री आहे. हो, पण तुम्ही कॉंग्रेस धार्जिणे आहात, एका घराण्याचे तळवेचाटू आहात, अगदी देशद्रोही आहात अश्या “पदव्या” मात्र नक्की मिळू शकतात.

हेही इंटरेस्टिंग आहे...

एक एक करुन अनेक गोष्टी करा. आणि मग एकदा मरा!

एक एक करुन अनेक गोष्टी करा. आणि मग एकदा मरा!

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

चव्हाण ते ठाकरे! कुणीकुणी भूषवलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद?

चव्हाण ते ठाकरे! कुणीकुणी भूषवलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद?

No Comment

Leave a Reply