भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

भाऊ तोरसेकर कोण आहेत? पत्रकार की राजकीय प्रवक्ते? 50 वर्ष पत्रकारिता केलेल्या भाऊ तोरसेकरांबद्दल असा प्रश्न उपस्थित होण्याचं नेमकं कारण काय?

सिद्धेश सावंत – भाऊ तोरसेकर. सत्तरी ओलांडलेल्या एका ज्येष्ठ पत्रकार आणि संपादकानं आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून महाराष्ट्रभर एक मोठा वाचकवर्ग तयार केला. ज्यावेळी गुगलच्या ब्लॉगवर त्यांच्या वयाचे फारसे पत्रकार इंटरनेटचा प्रभावीपणे वापर करु शकले नव्हते, तेव्हापासून भाऊ सोशल मीडिया कोळून पित आहेत. ब्लॉग लिहिण्यापासून ते स्वतःचं यू-ट्यूब चॅनेल काढण्यापर्यंतचा त्यांचा टेक्नोसॅव्ही प्रवास तरुणांनाही थक्क करणारा आहे. नवं तंत्रज्ञान शिकून घेण्याची आणि ते प्रभावीपणे वापरण्याची किमया त्यांनी करुन दाखवलीय.

तीन-साडेतीन महिन्यात दोनशेहून अधिक व्हिडीओ भाऊंनी बनवलेत. या आकडेवारीवरुन असं लक्षात येईल की जवळपास दररोज एक व्हिडीओ भाऊ सातत्यानं अपलोड करतातच. गेल्या काही दिवसांपासून रोज दोन व्हिडिओ अपलोड करण्याचा धडाका भाऊंनी सुरू केलाय. त्यांच्या व्हिडीओवरील विषयांची नावंही आकर्षक आहेत. गोष्ट सांगितल्यासारखी भाऊ मांडणी करत राहतात. भाऊ एक उत्तम स्टोरी टेलर आहेत, असं अनेकांना वाटतं. गेली ५० वर्ष भाऊ तोरसेकरांनी पत्रकारिता केली. तथ्य आणि त्याचे संदर्भ देत राजकीय घडामोडींवर विश्लेषण करण्यासाठी भाऊ तोरसेकर ओळखले जातात. देणगी गोळा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेट्रीऑनवर तयार केलेल्या आपल्या अकाऊंटरवरही ते अशीच आपली ओळख करून देतात.

भाऊ तोरसेकर किती सिनिअर माणूस आहे, हे कळण्यासाठी त्यांचा अल्पपरिचय –

संपूर्ण नाव – गणेश वसंत तोरसेकर
जन्म – ९ फेब्रुवारी १९४८
शालेय शिक्षण – डी. एस. हायस्कूल, सायन
महाविद्यालयीन शिक्षण – डी. जी रुपारेल कॉलेज, माटुंगा

(सोर्स – भाऊंचं फेसबूक अकाऊंट)

भाऊंचे चाहते असलेल्या रामदास निकम यांच्या मते, भाऊंनी आर्किटेक्चरमध्ये पदवी घेतलीय. भाऊंच्या पत्रकारितेमागच्या या आर्किटेक्टची गोष्ट लोकांना फारशी माहीत नाही.

पत्रकारीतेतील करिअर –
मराठातून पत्रकारीतेला सुरुवात केल्याची माहिती
सकाळ मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक (मेट्रो एडिटर)
मार्मिकमध्ये कार्यकारी संपादक
आपला वार्ताहरमध्ये मुख्य संपादक
विवेक, चित्रलेखा यांसारख्या अनेक मासिकांसाठी आणि दिवाळी अंकांसाठी लिखाण.
जागता पहारा नावानं ब्लॉग लेखन.

भाऊंनी काही पुस्तकंही लिहिलीत. त्यापैकी काहींची नावं खालीलप्रमाणे –
१. अर्धशतकातलं अधांतर- इंदिरा ते मोदी
२. कोंबडं झाकणाऱ्या म्हातारीची गोष्ट
३. महाराष्ट्राचा जनादेश
४. पुन्हा मोदीच का म्हणून?
५. कोरी पाटी

प्रतिपक्ष हे भाऊ तोरसेकरांच्या टू-ट्यूब चॅनेलचं नाव. थिंक बँक, द पोस्टमन यासारख्या यू-ट्यूब चॅनेलवर भाऊंचे व्हिडीओ आधीही येत होते. राजकीय अभ्यासक म्हणूनही ते वृत्तवाहिन्यांवर दिसले. अशातच प्रतिपक्ष हे भाऊंचं स्वतःचं यू-ट्यूब चॅनेल ३ एप्रिल २०२० या दिवशी सुरु झालं. गेल्या दोनचार दिवसांत या चॅनेलनं १ लाख सबस्क्राईबर्सचा पल्ला पार केलाय. हा आकडा रोजच्या रोज वाढतोय.

ब्लॉग लेखक म्हणून प्रसिद्ध झालेले भाऊ गेल्या पाच-सहा वर्षांत वक्ता म्हणूनही भाषणं देतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष, हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमांत त्यांना वक्ता म्हणून बोलावलं जातं. पण आता कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे पारंपरिक स्वरुपातली सार्वजनिक कार्यक्रमं जवळपास ठप्प झालीत. अशाच या रिकामपणाच्या काळात भाऊंनी प्रतिपक्ष नावाचं स्वतःचं युट्यूब चॅनेल काढलंय.

प्रतिपक्ष नावाच्या भाऊंच्या चॅनेलवर व्हिडीओ पाहता येतो. पण त्यावर कमेंट करता येत नाही. जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषदांना चुकवत वन-वे मन की बात करतात, तसंच भाऊंनाही कमेंट्स आणि टीका नको आहे का? कारण या चॅनेलवरच्या कमेन्ट्स ऑफ करण्यात आल्यात.

भाऊंना आवडत नाही!

‘अनावश्यक टिपण्ण्या येतात, त्या मला आवडत नाहीत,’ असं भाऊ लाखमोलाच्या गोष्टी या व्हिडीओमध्ये ठळकपणे नमूद करतात. ज्यांना चुका दाखवायच्या आहेत, वेगळं सांगायचं आहे, असे लोक फोनवरुन, ई-मेलवरून मला माहिती देतात. मला माझी चूक दाखवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. लोक हे कष्ट घेतातही, असाही विश्वास भाऊंनी व्यक्त केलाय. शरद पवारांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप भाऊ तोरसेकरांवर करण्यात आला होता. पुण्यात दाखल तक्रारीमुळे भाऊंना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं. असा मनस्ताप पुन्हा होऊ नये, यासाठी कमेन्ट सेक्शन बंद केल्याचं भाऊंचं म्हणणं आहे.

भाऊ तोरसेकर लिहितात. नुसतं लिहीत नाहीत. तर लिहीतच सुटतात. थांबतच नाहीत. ते कोणत्याही विषयावर लिहू शकतात. बोलू शकतात,  अशा आशयाची पोस्ट मंदार भारदेंनी लिहिली. ती प्रचंड वायरल झाली. त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला. टीका झाली. चर्चा रंगली.

Source – Facebook

मंदार भारदेंची फेसबूक पोस्ट वाचण्यासाठी इथे क्लिक करा

भाऊंवर फेसबूक पोस्ट करणाऱ्या मंदार भारदे यांच्याशी आम्ही बातचीत केली. ते म्हणतात,

‘भाऊंविषयी मला प्रचंड आदर आहे. मी त्यांना कधीच भेटलेलो नाही. त्यांच्याशी कधी बोलणंही झालं नाही. त्यांचा ब्लॉग मी फॉलो करत होतो. कोणताही मुख्य प्रवाहातील ब्रॅन्ड पाठीशी नसताना एका वयस्कर माणसाने सोशल मीडिया इतक्या जबरदस्त ताकदीनं वापरण्याचं मला कुतूहल वाटतं. पत्रकार म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीवर भाष्य करणं अपेक्षित आहे. पण म्हणून अभ्यास न करता, आपल्या मनाला वाटेल ते, इललॉजिकल गोष्टी जर कुणी आपल्यावर बिंबवत असेल तर ते योग्य नाही. भाऊंकडून तेच होत होतं. त्यामुळे त्यांची खिल्ली उडवण्यासाठी म्हणून फक्त मी पोस्ट केली. दुसरा काहीही उद्देश नव्हता.

भाऊ जवळपास प्रत्येक विषयावर बोलू शकतात. भाऊंनी लडाखच्या गूढ कथा नावाची मालिकाही भाऊंनी चालवली. ते गँगस्टर विकास दुबेवरही निष्णात जाणकारासारखं बोलतात. सीमाप्रश्न, गुन्हेगारी, राजकारण (महाराष्ट्र आणि देश दोन्ही), जागतिक घडामोडी, दैनंदिन घडामोडी (करंट अफेअर्स) अशा विषयांवर त्यांचा भर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करण्यासाठी तुफान बॅटिंग करणं, हा भाऊ तोरसेकरांचा फेवरेट पीच असल्यासारखंच आहे. शरद पवार, अजित पवार यांच्यावर ते भरभरुन बोलतात. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्यावरही ते अमर्याद बोलताना दिसतात. पण भाऊंच्या व्हिडीओला दिलेलं नाव आणि त्यात असणारा कंटेट यात जमीन आसमानाचा फरक असू शकतो.

अफझल खानाचा कोथळा – या शीर्षकाच्या व्हिडीओमध्ये अफझल खान आणि शिवाजी महाराज यांच्यातील भेटीबाबत अधिक काहीतरी मिळेल म्हणून जर तुम्ही व्हिडीओ क्लिक करत असाल, तर तुम्ही चुकताय. त्यात तसं काहीच सापडत नाही. उलट एक काल्पनिक किस्सा सांगून राजकीय घडामोडींवर केलेली एक कमेंट २७ मिनिटं ४३ सेकंद खर्ची केल्यानंतर फक्त दिसते. ६५ हजारांहून अधिक लोकांनी इतका वेळ खर्च करुन हा व्हिडीओ पाहिलाय.

‘आपल्याकडचे सध्याचे पत्रकार उंदीर पोखरुन डोंगर काढतात’, असा टोला भाऊ आपल्या व्हिडीओमध्ये लगावतात. ‘सगळ्या गोष्टी भाजप आणि काँग्रेसवर आणून चर्चा केली जाते’, असाही एक आरोप ते टीव्ही चॅनेलवरील वादविवाद कार्यक्रमांवर करतात. पण भाऊंच्या व्हिडीतोही आपल्याला हेच दिसतं. त्यांच्या बहुतांश व्हिडीओमध्ये तर आपल्याला संदर्भच आढळत नाही. आढळतात तर फक्त काही काल्पनिक गोष्टी आणि त्याच्या आधारावर केलेला युक्तीवाद.

भाऊंच्या युट्यूबवरच्या खाणाखुणा आपण शोधल्यास विनायक पाचलग यांच्या थिंक बँकपासून ते व्हिडीओच्या प्रेमात पडल्याच दिसतं. त्यानंतर त्यांनी व्हिडीओचं तंत्र शिकून घेतलं. भाच्याच्या मदतीने ते आपले व्हिडीओ तयार करतात. यातून त्यांची निष्ठावान कार्यतत्परता दिसून येते. वयाच्या सत्तरीत असं सगळं करणारे फार थोडे लोक आजूबाजूला आहेत. त्यात एक भाऊ तोरसेकरही आहेत, ही गोष्ट वाखाण्याजोगीच.

खरंतर भाऊ तोरसेकर न्यूज चॅनेलच्या चर्चांमधून घराघरात पोचले. काँग्रेसवर सडकून टीका करणाऱ्या भाऊंनी राजकीय विश्लेषक म्हणून मोदींना आणि भाजपला झुकतं माप दिलं. ३० मे २०१९ ला केलेल्या एका फेसबूक पोस्टमध्ये ते लिहितात,

‘मैं जन्म से जनसंघ और भाजप का मतदाता हूँ.’

Souce – Facebook

ज्येष्ठ पत्रकार आणि आपलं महानगरचे कार्यकारी संपादक संजय परब हे भाऊ तोरसेकरांबद्दल सांगतात,

‘लिखाण करण्याची भाऊंची क्षमता प्रचंड आहे. त्याबद्दल कौतुकच आहे. समाजवादी विचारसरणीतून घडत गेलेल्या भाऊंचं अचानक मोदीकरण का झालं, हे चक्रावून टाकणारं आहे. भाऊ फटकळ आहेत. पण जीवाला जीव लावणारे, मदत करणारेही आहेत. भाऊ तोरसेकर संघाचा माणूस नाही. ते निव्वळ मोदींचे फॅन आहेत. २०१४पासून त्यांचं मोदीप्रेम लख्खपणे त्यांच्या लिखाणात आणि बोलण्यात दिसतं.’


त्यामुळे भाजपबद्दल आणि मोदींबद्दल त्यांच्या लिखाणात-बोलण्यात झुकतं माप दिसतं. यूट्यूब चर्चा, टीवी चर्चांमधे पत्रकार म्हणून सहभागी होणाऱ्या भाऊंबद्दल एक मुलभूत प्रश्न तयार होतो. तुम्ही एखाद्या पक्षाच्या, व्यक्तिच्या बाजूने बोलत असाल तर तुम्हाला पत्रकार का म्हटलं जावं? माणूस एकांगी झाला की त्यावर मर्यादा येतात. पत्रकार कधीच एकांगी असू नये, हे तर विसरुन चालणारच नाही. योग्य आणि अयोग्य दोन्ही बाजू ऐकून घेणं, हे तर पत्रकाराचं कर्तव्यच आहे.

भाऊ आणि जबाबदार?

पत्रकार हे एक जबाबदारीचं काम आहे. त्यात भाऊंसारखा ज्येष्ठ आणि वयस्कर माणूस जबाबदारीनं वागतोय का, याचाही विचार होणं गरजेचं आहे. आठव्या, नवव्या महिन्यात रांगणारं बाळ चालू लागण्याचं जितकं कौतुक करायला हवं, तितकंच वयाच्या सत्तरीत भरपूर काम करणाऱ्या माणसाचंही करायला हवंच. पण बाळ चालू लागल्यानंतर जमिनीवरची माती खाऊ लागतं, तेव्हा आई दोन धपाटे घालतेच. हे धपाटे बाळाला वळण लावतात. पण भरपूर काम करता करता, आपण केलेलं काम योग्य आहे की अयोग्य?, चूक आहे की बरोबर? हे बघणाऱ्या व्यक्तीला भाऊंना सांगताच येत नसेल, तर मात्र कुठेतरी चुकतंय.

युट्यूब चॅनेलवर आपल्या डिस्क्रीप्शनमध्ये भाऊ देणगी मिळवण्यासाठीही आवाहन करतात. डोनेट करण्यासाठी ते एक लिंकही देतात. असंच आवाहन आपल्याला ध्रुव राठीही करताना दिसतो. रिसर्च करण्यासाठी ध्रुव देणगी देण्याचं आवाहन करतो. त्याच्या कंटेटमध्ये आपल्याला विविधता आणि माहिती खच्चून भरलेली दिसते. भाऊंच्या व्हिडीओत विश्लेषण सोडलं तर आपल्याला माहिती (information) दिसत नाही. मग भाऊंना पैसे कशासाठी हवे आहेत? जगण्याची भ्रांत झाल्यामुळे जर त्यांनी यू-ट्यूब चॅनेल सुरु करुन देणगीचं आवाहन केलं असेल, तर त्यांना आपण सढळ हाताने मदत केलीच पाहिजे. पण विश्लेषणासाठी जर ते पैसे मागत असतील, तर आतापर्यंत ज्या २० हून अधिक लोकांनी त्यांना मदत केली आहे, त्यांचे पैसे सत्कारणी लागलेत का, हा खरा प्रश्न आहे

Source – Youtube

भाऊंना पाहिलं जातं का?

‘भाऊ तोरसेकर हा वयस्कर माणूस आहे. दातही त्याचे पडलेले आहेत. तो बोलतानाही बऱ्याचदा अडखळतो, तरीही एवढे लोक त्यांना का पाहतात?’ असा मुद्दा शेतकरी संघटनेचा बिल्ला लावणारे कार्यकर्ते आणि भाऊंचे चाहते श्रीकांत उमरीकर उपस्थित करतात. ऍनालायझर या यूट्यूब चॅनेलवरच्या एका चर्चेत संपादक सुशील कुलकर्णींच्या प्रश्नाचं उत्तर देताना उमरीकर भाऊंच्या लोकप्रियतेच रहस्य उलगडून दाखवतात.

उमरीकरांच्या मते, ‘एखादा माणूस सत्य दाबू पाहत असेल. आणि तुम्ही त्यावर बोललात, तर ते सोशल मीडियात ताबडतोब पसरतं. अशावेळी तुम्ही जी मांडणी केली होती ती खोटी ठरते. नवीन माध्यमाच्या ताकदीचा भाऊंना फायदा झाला.’

Source – Youtube

श्रीकांत उमरीकर अगदी योग्य म्हणतात. त्यांच्या या वक्तव्याचा आधार घेतच १०० हून जास्त लोकांनी मंदार भारदेंची पोस्ट शेअर तर केली नसेल ना? मुळात एखादी गोष्ट पाहिली जाणं म्हणजे ती गोष्ट चांगली आहे, असा होतच नसतो.

एप्रिल २०२० मध्ये भाऊ तोरसेकरांचं प्रतिपक्ष हे यू ट्यूब चॅनेल (YouTube Channel) आलं. ३ महिन्यांत त्यांनी १ लाख सबक्राईबर्सचा (Subscribers) आकडा पार केलाय. पण त्यांच्या व्हिडीओचे व्हूज (Video Views) पाहिले, तर त्यात लक्षणीय हिट्स दिसत नाही. जागता पहारा हा त्यांचा ब्लॉग १ कोटी लोकांनी वाचल्याचा दावा केला जातो. पण व्हिडीओच्या बाबतीत मात्र भाऊंना फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. भाऊंचे चार-दोन व्हिडीओ सोडले, तर त्यांना ओढूनताणून सरासरी ६० ते ७० हजारापर्यंत व्हूज (Views) मिळतात. १ लाख सबस्क्राईबर असणाऱ्या या चॅनेलसाठी ही बाब भूषणावह नक्कीच नाही. त्यातही त्यांच्या व्हिडीओला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो. सोशल मीडियामध्ये असणारी भाजप समर्थकांची सक्रियता पाहता, त्यांना मिळालेले व्हूज हे तर अगदीच नगण्य आहेत.

दुसरीकडे जुलै महिन्यात सुरु झालेलं एबीपी माझात (Abp Majha) काम केलेल्या पत्रकार आणि अँकर हर्षदा स्वकुळ यांचं यू-ट्यूब चॅनेल पाहिलं तर त्याला २० दिवसातच ५८ हजारापेक्षा जास्त सबस्क्राईबर्स आहेत. जिथे भाऊंना १ लाख पार करायला ३ महिने लागले, त्यातले निम्म्याहून अधिक सबस्क्राईबर्स हे हर्षदाने २० दिवसांतच मिळवलेत. कदाचित स्वतःच्या व्हिडीओ आणि ब्लॉग बद्दल भाऊंनी घातलेल्या डिस्क्लेमरमुळेही लोक त्यांच्याकडे फिरकत नसावेत. ते लिहितात,

वैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फिरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.

याचा अर्थ एकच. तुम्हाला आमचे विचार पटत नसतील, तर आमच्यापासून दूर राहा. आम्हाला समजावण्याच्या भानगडीत पडू नका. आम्ही जसे आहोत, तसेच राहणार आहोत. विरोध, टीका, ऐकून स्वीकारण्याचं मोठेपण वयाच्या सत्तरीतही माणसाकडे येत नाही, हे चिंता करायला लावणारं आहे.

ट्रोलिंगच्या पलिकडे गेलेले भाऊ

अनेकदा जसं एबीपी माझाला बीजेपी माझा म्हणून ट्रोल केलं जातं. तसंच भाऊ तोरसेकरांनाही ट्रोल केलं जातं. पण भाऊंना ट्रोलिंगशी काही देणंघेणं नाही. ते त्याच्या पलीकडे गेलेत. वयाची सत्तरी ओलांडलेल्या माणसाला त्यानं काय बोलावं, कसं बोलावं, कुणाबद्दल बोलावं, हे सांगण्याची दुर्दैवानं आपल्याकडे सोय नाही. कदाचित म्हणूनच मंदार भारदेंनी फेसबूक अकाऊंटवरुन भाऊंवर जे उपहासात्मक लिहिलं, त्याची दाद देताना भाऊंना स्वतःच्याच मोठेपणाचा आवर्जून उल्लेख करावा लागला, हे विशेष!

भाऊंनी मेनस्ट्रीम मीडियात काम न करता सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत स्वतःला ओपिनिअर मेकरच्या भूमिकेत आणलं. पण एक पत्रकार म्हणून आपण मांडत असलेलं मत एका विशिष्ट राजकीय, जातीय, सामाजिक हेतूंनी प्रेरीत तर नाही ना? याचा विचार भाऊ करताना दिसत नाहीत. कदाचित त्यामुळेच अनेक ज्येष्ठ पत्रकार त्यांच्यापासून दुरावले गेलेत. त्यांचं लिखाण वाचणं सोडून दिल्याचं अनेक पत्रकार मित्र सांगतात. तर अनेकजण त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं पसंत करतात.

महागुरु आणि त्यांचे भक्त

ओशोच्या म्हणण्यानुसार ‘फॉलोअर्स आर इडियट्स’. असाच सत्यसाईबाबांना फॉलो करणारा एक वर्ग होता. सचिन तेंडूलकरचंही नाव त्यात घेतलं जायचं आणि अशोक चव्हाणांचही. पण म्हणून सत्यसाई बाबांचे जादुई चमत्कार लोकांपासून लपून थोडीच राहिले. तसेच भाऊ तोरसेकरांचेही विचार लोकांना कळले आहेतच. १ लाख सबस्क्राईबर्स मिळवले आणि १ कोटी लोकांनी ब्लॉग वाचला, म्हणजे लोक आंधळेपणाने आपल्यावर विश्वास ठेवतात, असं होत नसतं. आज एक मंदार भारदे लिहित आहे, उद्या अनेक मंदार भारदे लिहू लागतील.
सचिन पिळगांवकरांना अभिनयही येतो. डान्सही ते भारी करतात. दिग्दर्शनही येतं. गाणंही गाता येतं. सगळ्यात सगळं येत असल्याचं भासवल्यानं महागुरु म्हणून सचिन पिळगावकरांना कौतुकानं म्हटलं जातं की उपहासाने, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. सगळ्यातलं सगळं कळणारे भाऊ तोरसेकरही महागुरुंप्रमाणेच आहेत, असं म्हणायला वाव आहेच. त्यांना फॉलो करणाऱ्या लोकांच्या कमेंट वाचल्यावर भक्त कुणाला म्हणतात, याचीही प्रचिती येऊ शकते.

सर्वसामान्य पब्लिकला काही कळत नाही, असं समजणं सगळ्यात आधी सर्वच जाणकारांनी सोडून दिलं पाहिजे. 1 लाख सबस्क्राईबर्स असूनही भाऊंचे व्हिडीओ जर सरासरी 50 ते 70 हजारापर्यंतच जातात. याचा अर्थ लोकं एका मर्यादेच्या पलिकडे भाऊंनी ऐकू शकत नाही. भाऊ तोरसेकरांच्या व्हिडीओला एक मर्यादा आहे. भाऊ अमर्याद विषयांवर बोलत राहतील. लिहीत राहतील. पण कुठे, कुणाला, कसं थांबवायचं, याच्या मर्यादा पब्लिकला बरोबर कळतात. भाऊंच्या व्हिडीओवर फेसबूवर कमेन्ट युद्ध रंगतं. त्यातही येणाऱ्या अनेक लोकांच्या कमेन्ट्स एकाच अर्थाच्या आहेत. त्यालाही मर्यादा आहेत. आणि मर्यादित असणं हे खुंटण्याचं लक्षण आहे.

हेही इंटरेस्टिंग आहे...

एक एक करुन अनेक गोष्टी करा. आणि मग एकदा मरा!

एक एक करुन अनेक गोष्टी करा. आणि मग एकदा मरा!

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

खूप श्रीमंत.. खूप खूप श्रीमंत.. आणि मग येतात नाना शंकरशेठ

खूप श्रीमंत.. खूप खूप श्रीमंत.. आणि मग येतात नाना शंकरशेठ

‘कोरोनामुक्त झालो, पण प्रवास सोप्पा मुळीच नव्हता’ | भाग 02

‘कोरोनामुक्त झालो, पण प्रवास सोप्पा मुळीच नव्हता’ | भाग 02

No Comment

Leave a Reply