‘कोरोनामुक्त झालो, पण प्रवास सोप्पा मुळीच नव्हता’ | भाग 02

‘कोरोनामुक्त झालो, पण प्रवास सोप्पा मुळीच नव्हता’ | भाग 02

एबीपी माझाचे आऊटपूट हेड राहुल खिचडी आणि त्यांची पत्नी कोरोनामुक्त झाली. पण या संपूर्ण प्रवासाचा अनुभव त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या फेसबूक पोस्टवरुन घेतलेला हा अनुभव पुढे कॉपी पेस्ट… कोरोनामुक्त होण्याचा प्रवास सोप्पा नसतो, असं गायत्री खिचडी का म्हणत आहेत? वाचा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह व्ह्याया पॉझिटिव्ह भाग दुसरा … या जगण्यावर शतदा प्रेम करावे ….

गायत्री खिचडी – कोरोना मुक्त तर झालो पण प्रवास सोप्पा मुळीच नव्हता. शरीरात कोव्हिड आहे ही कल्पना तुम्हाला नक्कीच डिस्टर्ब करते. त्यात माझी लक्षणे बरीच तीव्र होत गेली. राहुल नंतर पाचदिवसांनी रात्री ताप आला.. पॅरासिटॅमॉल आणि एझिथ्रोमायसिन लगेच चालू केले.

रोज एक नवे लक्षण या प्रमाणे दुसऱ्या दिवशी घसा पूर्ण बंद झाला. नेहमी पेक्षा ही घसाबंदी नक्कीच वेगळी होती. जनरली मला सर्दी होण्याआधी २ दिवस असा त्रास होतो पण हा खूप वेगळा होता. विचारांचा वेग भन्नाट असतो कशात काहिही नसताना तुम्ही क्षणात बरेच दूर जावून येता. नाटकामुळे शिकलेले स्विच ऑन ऑफ चे तंत्र अक्षरशः आमलात आणले आणि विचार करण्यापेक्षा कृतीवर भर दिला.

झेपेल तितक्या गरम पाण्याची वाफ. दर एक तासाने पेलाभर गरम पाणी, गुळण्या आणि हळद, गुळ मधाचे चाटण संपूर्ण २४ तास (अगदी रात्री उठून अलार्म लावून) हे केलंच कारण मला स्वतःला सर्दी होवू द्यायची नव्हती, घसा कोरडा पडू द्यायचा नव्हता. दरम्यान राहुल चा ताप वर खाली होत होता. त्याचे उपचारही चालू होते. डॉ. स्वप्ना चौबळ यां च्या संपर्कात होतो. या सगळ्या उपायांनी काम केलं आणि दुसऱ्या दिवशी माझा घसा संपूर्णपणे बरा झाला …होय बरा झाला.

पण हे उपाय मी चालू ठेवले. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चव गायब झाली आणि मग सकाळी गंध गायब झाला. शरीरात थकव्याने प्रवेश केला होता आणि आमचा टेस्ट करायचा निर्णय झाला होता. टेस्ट होऊन रिपोर्ट येवून लाईन ऑफ ट्रिटमेंट ठरायला किमान ४८ तास लागणार होते. कोरोना झाला आहे हे त्याआधीच आम्हाला लक्षात आलं होतं त्यामुळे लढा चालू झाला होता.

आवर्जुन सांगेन माझ्या विनायक ब्लेसिंग्ज मधल्या प्रत्येकाने अगदी प्रत्येकाने खूप धीर दिला. त्यांच्या ऋणात तर आम्ही आयुष्यभर राहू. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोना शरीरात आहे पण त्याला मनात शिरू न देणं आपल्या हातात आहे. एकूण काय तर तो त्याचं काम करत होता आणि आम्ही आमचं काम करत होतो. दिवस चौथा आणि पाचवा लूज मोशन आणि श्वासाचा त्रास सुरु झाला होता. थकवा अजुन वाढला. लगेच ORS च प्रमाण वाढवलं आणि इच्छा नसतानाही जमेल तस जेवण जेवत राहिले. या सगळ्यात स्वतः ला सतत पुश करत राहणं खूप महत्वाचं.

श्वासाचा त्रास होत होता. श्वासाचे व्यायाम चालू केले होते. दीर्घ श्वास ठरवून घेत होते त्यामुळे की काय oximeter वर लेव्हल ९६ च्या खाली गेली नव्हती. टेस्ट झाली .. रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तीव्र लक्षणे असल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये जाणं भाग होतं. बरोबर २४ तासांनी मला मुंबई सेंट्रल च्या Wockhardt Hospitals मध्ये बेड मिळाला.

रोज ऐकत असलेला ॲंब्युलन्सचा सायरन आज माझ्यासाठी वाजत होता. आत बसल्यावर हायवे येईपर्यंत डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं पण … पण पुन्हा स्विच ऑन /ऑफ .. म्हटलं इतक्या महिन्यांनी बाहेर पडले आहे. मुम्बई मेरी जान तर बघितलीच पाहिजे. सुसाट जाणारी ॲंब्युलन्स.. हलका पाऊस… थंड वारा … मी प्रवास ऐजॉय करत राहिले. गाडी माझ्या करीरोड वरच्या जुन्या घरावरुन गेली आणि मुम्बईत आले त्यादिवसापासूनचा प्रवास झरकन डोळ्यासमोर आला.

तिथून अगदी ३ मिनिटात गाडी हॉस्पिटलसमोर आली. फोर्मलिटीज पूर्ण होइपर्यंत आत बसावं लागलं आणि अचानक ड्रायव्हरने मागचा दरवाजा उघडला. स्वतःचे सामान उचलले आणि गेट समोर येवून उभी राहिले. फुटपाथवरचे सगळे लोक १० फुट लांब गेले. सगळ्या नजरा माझ्यावर खिळल्या होत्या. काही क्षणांसाठी का होईना मला सेलिब्रिटी असल्यागत वाटलं.. आणि मग त्या पांढऱ्या शुभ्र दुनियेत माझं आगमन झाले. भिंतीचा पांढरा रंग, पीपीई किट मधले सगळे देवदूत.. ए सी ची थंड हवा.. विनंती करून ५ मिनिटे तिथल्या खुर्चीवर शांतपणे बसले. धाप लागली होती. दीर्घ श्वास घेणं चालू केलं.

मग औपचारिकता झाली आणि माझी रवानगी १८ व्या मजल्यावर झाली. अजुन दोघीजणी त्या रुममध्ये होत्या. मैत्री आणि जिया. एक मोठी खिडकी आणि दूरवर दिसणारा समुद्र. आल्या आल्या दोघींनी छान हसून माझं स्वागत केलं आणि रुमचा कोरम फुल झाला. पुढच्या १५ मिनिटात डॉक्टर आल्या. चौकशी झाली .. symtoms विचारले आणि line of treatement ठरली. मन थोडं निश्चिंत झालं कारण मी आता हॉस्पिटलमध्ये होते.

एका बेलच्या अंतरावर सगळे हजर होणार होते.. आणि अगदी तीन एक तासात मला १०२ ताप चढला जितक्या वेगाने चढला तितक्याच वेगाने उतरला … पुन्हा थकव्याची ॲडीशन देवून गेला. जमेल तस खाणं, शेजाऱ्यांशी थोड्या गप्पा .. राहुलशी, सासुआईंशी बोलणं त्यांची चौकशी यात दोन दिवस गेले. मी स्टेबल होते. तिसऱ्या दिवशी अचानक तब्येत बिघडली. छातीवर मणभर ओझं पडावं असं झालं, प्रचंड भिती दाटून आली .. BP / Oxileval / heartbits सगळं नॉर्मल होतं तरिही. मग मला IV लावलं. त्यांनंतर थोडं बरं वाटलं.

आवर्जून सांगवंस वाटतंय डॉक्टर मनिष त्यांचा दुसराच दिवस होता. एकदम उत्साही माणूस. त्यांनी एका वाक्यात सांगितलं ये सब होगा, बॉडीसे ज्यादा तुम्हारे माइंडपे असर होगा. जितना सोचोगे उतना ॲटीबॉडीज का काम कम होगा और कोरोना जितेगा.. तो सोचो मत चिल मारो और कोरोनाको हराओ. मी पुन्हा चार्जअप…. एव्हाना वॉर्डबॉय .. नर्सेस .. डॉक्टर यांच्याशी मैत्री झाली होती. आपला त्रास काहिच नाही असं वाटलं जेव्हा PPE किट घातल्यावर त्यांना होणारा त्रास पाहिला ऐकला .. तरिही प्रत्येकाच्या बोलण्यात आपुलकी, आणि एक विश्वास होता तुम्हाला बरे करण्याचा.

माझ्या शेजारची जिया तर वर देवाला Hello करुन आली होती त्यामुळे तिच्यापेक्षा आपण खूप बरे असं वाटत होतं. तिघींनाही होणारे त्रास वेगवेगळे. एकमेकांशी बोलत, एकमेकींना सांभाळत, मानसिक आणि शारीरिक उपचार घेत होतो .तिसऱ्या दिवशी मैत्रीचा report negative आला चौथ्या दिवशी जिया आणि पाचव्या दिवशी माझा.

आम्ही तिघींनीही कोरोनावर यशस्वी मात केली होती. सहाव्या दिवाशी कोरोनामुक्त होवून मी घरी परतले. आता Post Covid त्रास तर सहन कारावेच लागणार. हत्ती गेला शेपूट बाकी आहे.

कोरोनाने काय शिकवलं?

१) कोरोना बरा होऊ शकतो.

२) जान है तो जहां है !

३) तुमचं शरीर तुमच्याशी बोलतं त्याचं ऐका. जिभेचे लाड करु नका, शरीराचे करा.

4) मानसिक कणखरपणा

5) परिस्थिती स्विकारायची ताकद

6) दोन नव्या मैत्रीणी

7) आयुष्यावर पुन्हा पुन्हा प्रेम करण्याची अचाट ताकदहक्काने सांगते आहे .. जितक्या लवकर आपण कोरोनाचे अस्तित्व स्विकारु पुढच्या गोष्टी तितक्या लवकर नॉर्मल होत जातील..This Is The New Normal …

हेही इंटरेस्टिंग आहे...

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

खूप श्रीमंत.. खूप खूप श्रीमंत.. आणि मग येतात नाना शंकरशेठ

खूप श्रीमंत.. खूप खूप श्रीमंत.. आणि मग येतात नाना शंकरशेठ

भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

लक्षणं नसलेल्या कोरोनाग्रस्तांकडूनही धोका?

लक्षणं नसलेल्या कोरोनाग्रस्तांकडूनही धोका?

No Comment

Leave a Reply