इतकी काळजी घेऊनही लक्षणं दिसू लागली – राहुल खिचडी

इतकी काळजी घेऊनही लक्षणं दिसू लागली – राहुल खिचडी

एबीपी माझा या वृत्त वाहिनीचे आऊटपूट हेड राहुल खिचडी कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह होण्यापासून ते कोरोना निगेटीव्ह होण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी शब्दबध्द केला आहे. त्यांच्यासोबतच त्यांची पत्नी गायत्री खिचडी यांनाही संसर्ग झाला होता. कोरोना पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह या प्रवासाचं वर्णन त्यांनी फेसबूक पोस्टमधून केलं आहे. त्यांची ही फेसबूक पोस्ट पुढे कॉपी पेस्ट

राहुल खिचडी – पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह व्हाया “पॉझिटिव्ह”

जुलैच्या १ तारखेपासून सुरु झालेला प्रवास आम्हाला इथं पर्यंत घेऊन आला आहे! कारण कोरोनाची लागण आणि मुक्तीचा हा प्रवास आहे! बऱ्याच जणांना आम्ही कोरोनाची लागण झाल्याची कल्पना दिली नाही! कारण आम्हाला कोरोनामुक्तीची माहिती तुम्हाला द्यायची होती!

कोरोनाचा प्रकोप सुरु झाल्यापासून चार महिने एखादीच सुट्टी घेऊन काम सुरु होते. कोरोनाला टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत होतो! सॅनिटायझर, मास्क, हँडग्लव्हज सगळं काही वापरायचो… रोज घरी आल्यानंतर कपडे वॉशिंग मशीनला पडायचे… गरम पाण्याने आंघोळ व्हायची… पण इतकी काळजी घेऊनही ३० जून रोजी मला कोरोनाची हलकी लक्षणे दिसू लागली! पण प्रत्येक ताप हा कोरोनाचाच असतो असं नाही, त्यामुळे तापावरचे उपचार सुरु केले… चार दिवस ताप वर-खाली होत होता, तितक्यात खोकला सुरु झाला! त्यावरही औषधे घेतली.

दरम्यानच्या काळात आम्ही स्वतःला क्वारंटाईन करुन घेतले… घराच्या बाहेर पडणे बंद केले…. कारण आमच्यामुळे कुणाला संसर्ग होऊ नये याची काळजी घेतली…. पण ६ तारखेला गायत्रीलाही लक्षणे दिसू लागली, तेव्हा आम्ही कोरोना चाचणीचा निर्णय घेतला! ७ तारखेला प्रचंड पावसामुळे टेस्ट टळली… पण ८ तारखेला ठाण्याच्या वैद्य लॅबच्या मित्राने स्वॅब कलेक्षनसाठी माणसे पाठवली… कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येणार अशी मनाची तयारी आम्ही केली होती…! माझी लक्षणेही आता ओसरली होती… पण गायत्रीला प्रचंड थकवा होता… ९ तारखेला दोघांचाही कोरोना रिपोर्ट अपेक्षेप्रमाणे पॉझिटिव्ह आला… गायत्रीची लक्षणे तीव्र असल्याने तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले… पण फार लक्षणे नसल्याने मी घरीच आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला!

आमच्या सोसायटीतल्या प्रत्येक सदस्याने पूर्ण सहकार्य केले… अगदी घरच्या माणसांसारखी काळजी घेतली… गायत्रीची मावशीच आमच्या इमारतीत राहत असल्याने माझ्या खाण्यापिण्याचे हाल झाले नाहीत… उलट रोजचा पोषक आहार मिळाला…. अगदी वॉचमनपासून इमारतीतल्या प्रत्येकाने आपल्या परीने मदत केली… धीर दिला! तिकडे गायत्रीलाही उत्तम ट्रिटमेंट मिळाली… आणि पाच दिवसात तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला…

१० तारखेला ॲडमिट झालेली गायत्री १५ तारखेला कोरोनाला हरवून घरी होती…. त्यामुळे मलाही कोरोनाची पुन्हा टेस्ट करणे भाग होते… १६ तारखेला माझी पुन्हा टेस्ट झाली… आणि अखेर माझाही रिपोर्ट निगेटिव्ह आला… कोरोनावरचे कोणतेही औषध न घेता… केवळ लक्षणांवरचे उपचार, आयुर्वेदिक काढे, पथ्याचे पालन आणि पोषक आहार या बळावर कोरोनाला हरवता येते हे लक्षात आलं… पण लक्षणे तीव्र असतील, तर रुग्णालयात जाणे गरजेचे आहे… हेही ध्यानात आलं..

अर्थात रिपोर्ट निगेटिव्ह आला, म्हणजे मोहीम फत्ते होत नाही… कारण शरिरातून नाहीसा झालेला कोरोना, त्यानंतरही तुमच्या शारीरिक आणि मानसिक कणखरतेची परीक्षा घेतो… पोस्ट कोव्हिडमध्ये निर्माण होणारी एंग्झायटी, नॉशिया, अस्वस्थता, थकवा, डोकेदुखी, अंगदुखी ही रोज वेगवेगळी लक्षणे सध्या सुरु आहेत… पण त्यावरही आम्ही मात करत आहोत… अजून क्वारंटाईनचा कालावधी संपायचा आहे… तोपर्यंत नक्की बाहेर पडू!

फक्त अनुभवी असल्याने काही सल्ले देतोय, नक्की उपयोगी पडतील!

१) प्रत्येकाने घरात पल्स ऑक्सिमीटर आणून ठेवा! रोजच्या रोज ऑक्सिजन लेव्हल चेक करा!

२) गरम पाणी, आयुष काढा यांचे सेवन करा.

३) दिवसातून एकदा तरी वाफ घ्या.

४) डॉक्टरच्या सल्ल्याने मल्टिव्हिटामिनच्या गोळ्यांचे सेवन करा, व्हिटॅमिन सी, डी, बीचे सेवन करा.

५) कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करु नका, त्यांची नोंद ठेवा

६) लक्षणे दिसल्यास घरातून बाहेर पडू नका!

७) लक्षणे दिसली तर तुमच्या डॉक्टरशी बोला…

८) लक्षणे कमी झाली नाही तर टेस्ट करुन घ्या..

९) लक्षणे दिसली, तर स्वतःला होम क्वारंटाईन करुन घ्या, जेणेकरुन इतरांना लागण होणार नाही….

१०) घरातून कोणतीही गोष्ट बाहेर जाणार नाही, याची काळजी घ्या… कचरा घरातच जिरवता आला तर बघा… अन्यथा कचऱ्याची पिशवी सॅनिटाईज करुनच बाहेर ठेवा.

११) चेहेऱ्याला सतत हात लावायची सवय मोडा. ३० सेकंद हात स्वच्छ धुतल्याशिवाय चेहेऱ्याला लावू नका.

१२) आहारात अत्यंत साधा आहर घ्या, लिक्वीड डाएट जास्त गरजेचा. रोज किमान ३ लि. पाणी गरजेचे.

१३) तेलकट, थंड, तिखट, मसालेदार खाण्यापासून लांब राहा!

१४) हलकेफुलके मनोरंजनाचे कार्यक्रम बघा! तारक मेहता का उल्टा चष्मा पण चालेल…

(आम्ही पाहिलं) पण जड आणि भीतीदायक काही बघू नका… मन शांत ठेवा, पॉझिटिव्ह राहा! कोरोना आता प्रत्येकाला होणार आहे, असं समजूनच जगण्याची गरज आहे… आजूबाजूला वाजणारे ॲंब्युलन्सचे सायरन धडकी भरवतात हे खरय…. पण त्यामुळे घाबरु नका… माणसं कोरोनाने कमी आणि भीतीने जास्त मरतायत… पॉझिटिव्ह राहा… आमचा रिपोर्ट १० दिवसात निगेटिव्ह आला… कारण आम्ही पॉझिटिव्ह होतो! ((कोरोना झाल्यानंतर अनुभव लिहायचा असतो, शास्त्र असतं ते))

हेही इंटरेस्टिंग आहे...

घर खरेदी करणं चांगलं की भाड्यानं राहणं चांगलं?

घर खरेदी करणं चांगलं की भाड्यानं राहणं चांगलं?

कुठे गाडी लावू? उबर की ओला? | धंदा एके धंदा

कुठे गाडी लावू? उबर की ओला? | धंदा एके धंदा

सिंगल स्क्रीनवरुन फोन स्क्रीनवर कशी आली ऍडल्ट फिल्म?

सिंगल स्क्रीनवरुन फोन स्क्रीनवर कशी आली ऍडल्ट फिल्म?

सुरुवातीला 140नंबरहून आलेला फोन उचल्यास लुटीचा धोका?

सुरुवातीला 140नंबरहून आलेला फोन उचल्यास लुटीचा धोका?

No Comment

Leave a Reply