…मग आंबेडकरांची जय म्हणण्याचा काही उपयोग झाला का?

…मग आंबेडकरांची जय म्हणण्याचा काही उपयोग झाला का?

कॉम्रेड गोविंद पानसरेंची फेब्रुवारी 2015मध्ये हत्या झाली. त्यांच्या हत्येने महाराष्ट्र हळहळला. कॉम्रेड पानसरेंनी बाबासाहेब आंबेडकरांवर गोव्यामध्ये एक व्याख्यान दिलं होतं. हे व्याख्यानं यू-ट्यूबवर त्यांच्याच नावाच्या चॅनेलवर आहे. विशेष म्हणजे त्यांच्या हत्येनंतरच्या एका वर्षानंतर हा व्हिडीओ अपलोड झाला आहे. त्यामुळे हे व्याख्यानं नेमकं कधीचं आहे ते सांगता येणार नाही. पण या व्याख्यानातील त्यांचं सगळं भाषण, पुन्हा पुन्हा वाचत राहावं असंच आहे. त्यांनी उपस्थित केले प्रश्न आजही तसेच आहेत. त्यांचं हे संपूर्ण भाषण beingreaderच्या वाचकांसाठी शब्दबद्ध करत आहोत.

टीम रिडर- माझ्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा माझं मत मांडण्यापूर्वी, अशी विचारणा केली ढवळीकरांकडे की किती वेळ बोलू? कारण मी बराच वेळ बोलू शकतो. आणि थोडक्यात ही बोलू शकतो. ते म्हणाले लोक ऐकतील तो पर्यंत बोला. मी तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही तुम्ही किमान 45 मिनिट मला सहन करा. मी कोल्हापूरहून आलो. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही गोष्टी तुमच्याशी बोलाव्यात, या हेतूनं आलो. म्हणून ही परवानगी आपल्याकडे मागितली.


पहिली गोष्ट अशी की, माझा इतक्या वर्षांचा अनुभव म्हणून सांगतो. आपल्या सर्व लोकांना सर्व भारतीयांना, त्याच्यामध्ये गोव्याचे लोकही अपवाद नसावेत, असा माझा समज आहे. आपल्याला महामानवांच्या प्रतिमा माहित असतात. महामानवांचे पुतळे आपण उभे करतो. महामानवांच्या जयंती किवा महापरिनिर्वाणाचे दिवस हे आपण साजरे करतो. ते बरोबरच आहे. ते चांगलं आहे. त्यात गैर काही नाही. पण त्या तुलनेनं त्यांचे विचार आपल्याला माहित नसतात. आपल्याला जयजयकार करायची सवय जरा जास्त आहे. म्हणजे कुणीही पुढे म्हणाला की अमक्या अमक्या की.. की आपण जय म्हणायचो. जयजयकार करायच्या गडबडीमध्ये त्यांचा नेमका विचार काय होता याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं.

बाबासाहेब आंबेडकर यांचं सर्वात मोठं काम कोणतं? त्यांनी भारतामधल्या आर्थिक आणि सामाजिक, राजकीयदृष्ट्या मागासलेल्यांना पुढे आणण्यासाठी काही कार्य केलं. त्या कार्यासाठी त्यांनी विचार केला. बाबासाहेब बॅरिस्टर व्हायला इंग्लंडला गेले होते. तिथून परत येताना त्यांनी काय आणलं?

एक प्रतिक म्हणून तुम्हाला सांगतो. कुणीही परदेशातून परत येताना त्या त्या ठिकाणचे एखादी चांगली वस्तू, तुलनात्मकरित्या स्वस्त असणारी वस्तू तिकडनं घेऊन येतात. हा ट्रेन्ड बाबासाहेबांच्या काळातही होता. पण बाबासाहेबांनी काय आणलं तिकडनं? 10 ते 12 पेट्या भरुन बाबासाहेबांनी पुस्तकं आणली. बाबासाहेबांचे जेवढे चरित्रकार आहेत, ते सर्व चरित्रकार असं सांगतात, बाबासाहेब दिवसाच्या 24 तासांपैकी 14-15 तास अभ्यास करत असत. वाचन करत. ही फार मोठी गोष्ट आहे.

महामानवांचा विचार किंवा उत्सव साजरा करताना आपण त्यांच्यापासून काय घ्यावं, काय शिकावं? आपण त्यांच्यापासून हे शिकावं की अभ्यास करावा. ज्ञान मिळवावं. ज्ञानाला पर्याय नाही.

हिंदी भाषेमध्ये एक म्हण आहे. आपल्याला जमलं तर लक्षात ठेवा. अक्कल बडी के भैस बडी?.. ज्ञान मोठं आहे की म्हैस मोठी आहे, हा प्रश्न आहे. अर्थात ज्ञान मोठं आहे. जगातल्या सर्वात मोठ्या प्राण्यापेक्षा ज्ञान मोठं आहे. जगातल्या सर्वात मोठ्या प्राण्यांना काबूत ठेवण्याचं काम माणसानं केलेलं आहे. कशाच्या जोरावर? ज्ञानाच्या जोरावर. ज्ञानाला पर्याय नाही. जगातील सर्वात प्रबळ, सर्वात मोठं जालिम असं हत्यार जर कोणतं? कुणी सांगेल अमकं रॉकेट, तमकं रॉकेट. किंवा बंदूक किंवा बॉम्ब. हायड्रोजन बॉम्ब किंवा अमका-तमका बॉम्ब.
बाबासाहेबांच्या चरित्राचं सार जर समजून घ्यायचं, तर ज्ञान हे जगातील सर्वात मोठं हत्यार आहे.

तुम्ही कोणतंही हत्यार काढा. ते हत्यार ज्ञानाच्या आधारे तयार झालेलंय. ते हत्यार तयार कुणी केलं? माणसाने केलं. कशाच्या जोरावर केलं? ज्ञानाच्या जोरावर केलं. ज्ञान ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पण ज्ञान हे दुधारी असतं. दुधारी म्हणजे दोन धारा असलेला. चांगलंही असतं आणि वाईटही असतं.

अणूबॉम्ब तयार केला. अणूची शक्ती निर्माण केली. त्या अणूच्या शक्तीच्या साहाय्यानं माणसंही मारता येतात आणि वीजही निर्माण करता येते. त्याच्यामध्ये अणूचा काही दोष आहे का? किंवा आपल्या दैनंदिन जीवनातलं उदाहरण जर द्यायचं म्हटलं, तर अग्नीच्या साहाय्यानं स्वयंपाकही करता येतो आणि त्याच अग्नीच्या साहाय्यानं घरंही जाळता येतात. याच्यामध्ये अग्नीचा काही दोष आहे का?

अग्नीचा काही संबंध नाही. हत्याचारा काही संबंध नाही. ते हत्यार कोण वापरतं आणि कशासाठी वापरतं, हे जास्त महत्त्वाचं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाचा वापर समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी केला. बाबासाहेब आंबेडकरांची काही वाक्य आपण लक्षात ठेवली पाहिजेत. त्या वाक्यांचा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर त्या वाक्यांची ताकद आपल्या ध्यानात येईल.

बाबासाहेबांनी असं सांगितलं की गुलामाला गुलामाची जाणिव करुन द्या म्हणजे तो त्याच्या गुलामीच्या विरुद्ध बंड करुन उठेल. त्याला जाणिव झाली पाहिजे की मला गुलाम करण्यात आलेलं आहे. आपल्या समाजामध्ये काल परवापर्यंत स्त्रीयांना दुय्यम लेखलं जात होतं की नाही? खरं म्हणजे अजूनही दुय्यम लेखलं जातं असं माझं मत आहे. अजूनही हुशार डॉक्टर विज्ञानाच्या साहाय्याने मातेच्या गर्भामध्ये असलेलं बाळ मुलगा आहे की मुलगी आहे की तपासातात. आणि मुलीचा गर्भ जर असेल तर तो मारला जातो. म्हणजे महिला आणि पुरुष, मुलगा आणि मुलगी यांना आपण समतेनं वागवत नाही. असं समतेनं न वागवणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या विरुद्ध आहे.

बऱ्याच वेळा आपण बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणतो. जोरानं जय म्हणतो. पण समाजातल्या इतर नातेवाईकांना बरोबरीनं वागवत नाही. मग आंबेडकरांची जय म्हणण्याचा काही उपयोग झाला का. त्यांच्या विचारांचं आपण अनुकरण करणार नसू तर आंबेडकर की जय म्हणण्याला काय अर्थ? गर्भात मुली सुरक्षित नाहीत. इतकंच नव्हे, गरिबीमुळे एखाद्या कुटुंबाला एक मुलगा एक मुलगी आहे. दोघांना शिकवता येणं शक्य नाही. दोघांपैकी एकालाच शिकवायचंय. त्यात जर दोघांपैकी एकाची निवड करण्याचा प्रसंग जर त्या कुटुंबावर आला कुणाचा नंबर लागतो? मुलचा नंबर लागतो की मुलीचा नंबर लागतो? माझा अनुभन असा आहे की मुलाचा नंबर लागतो. जरी तो अभ्यासात मुलीपेक्षा कमी प्रतीचा असला तरीही कुणाचा नंबर लागतो. मुलाचा नंबर लागतो.

सत्य आहे ना हे? मी एकच मुद्दा तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे. ज्ञानाला पर्याय नाही. ज्ञान मिळवलं पाहिजे. पण अजूनही मुलींना स्त्रीयांना स्वतःला सुद्धा आपण कमी आहोत, असं वाटतंय की नाही? कारण त्यांच्या मनावर तसा संसार केलेला आहे. शिकली म्हणून काय झालं, किंवा शिकली जरी तरी दुसऱ्याला देऊन टाकायची नाही, असं म्हणतात ना? मुलगा पाहिजे की मुलगी पाहिजे, असं विचारल्यावर काय सांगतात. मुलगा पाहिजे. वंशाचा दिवा पाहिजे. आता तो दिवा लावतो का अंधार करतो, हा मुद्दा वेगळा. परंतु पुरषाला प्राधान्य आहे की नाही. महत्त्वाचं म्हणजे अनेकदा महिलांना सुद्धा आपण बरोबरीच्या आहोत असं वाटत नाही.

माझी महिलांना विनंती आहे, की त्यांनी स्वतःला कमी लेखू नका. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. मला वाटतं गोव्याला एकदा मुख्यमंत्री महिला होत्या. शशितलाताई काकोडकर या महिला मुख्ममंत्री गोव्यात होऊ गेल्याचं मला आठवतं. सगळ्या पुरुष मुख्यमंत्र्यांबद्दल आदर बाळगून मी असं सांगतो, शशिकलाताई वाईट मुख्यमंत्री होत्या का? आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्यापैकी सर्वात सामर्थ्यवान कोण होतं? (लोकांमधून आवाज येतो – इंदिरा गांधी..) महिला होती ना. दाखवली ना तिनं ताकद. राष्ट्रपती महिला होत्या. लोकसभेच्या सभापती महिला होत्या. हे मी राजकारणातलं सांगितलं.

अंतराळामध्ये एक महिला गेली आपल्यातली. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. आपण कमी आहोत, हा न्यूनगंड महिलांना सोडला पाहिजे. महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने महिलांना माझी अशी विनंती आहे, की स्वतःला कमी लेखू नका. बाबासाहेबांचा हा एक विचार आपण लक्षात घेतला पाहिजे.

दुसरी एक गोष्ट सांगतो. प्रास्ताविकामध्ये या संघटनेच्या प्रमुखांनी एक वाक्य सांगितलं. ‘शिका संघटीत व्हा, आणि संघर्ष करा.’ हे नीट जरा समजून घ्या. अनेकदा आपल्याला शब्द माहित असतात. पण त्या शब्दांचा नीट अर्थ माहित असतोच असं नाही.

हिंदूधर्मशास्त्राप्रमाणे मुलीच्या लग्नामध्ये महत्त्वाचा विधी काय असतो? कन्यादान असं त्या विधीला म्हणतात. दान म्हणजे अर्पण करणे किंवा देऊन टाकायचं. अहो कन्या हे काय टेबल आहे का? दान करायला. कन्या ही काय दान द्यायची वस्तू आहे का. ती जिवंत गोष्ट आहे ना. तिला स्वतःचं असं काही मन आहे की नाही. माझ्या मते पाहण्याचा हा दृष्टीकोन बाबासाहेबांनी बदलला. शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा, म्हणजे काय करा.

शिका म्हणजे शिक्षण घ्या. शाळा कॉलेज प्राथमिक कॉलेज हे शिकाच. पण बाबासाहेब म्हणाले शिका, याचा अर्थ शाळेत, कॉलेजात शिकवलं जातं, तेवढंच शिका असं नाही. शाळा, कॉलेजात काय शिकवावं, हे तुमचे शिक्षक ठरवतात का? शिक्षकानं काय शिकवाव हे आणखी कुणीतरी ठरवतो. आणि तो जे ठरविल तेच शिक्षकाला शिकवावं लागतं. बाबासाहेबांचं चरित्र आणि त्यांचे विचार शाळा-कॉलेजात शिकवले जातात का? आणि मुळात शिकवलं काय जातं, तर अमक्या तारखेला जन्माला आले. शिकायला इंग्लंडला गेले. बॅरिस्टरला गेला. नेहरुंच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. पाहिजे तसा कारभार करता येत नाही म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा दिला. वयाच्या शेवटी शेवटी त्यांनी बुद्ध धर्म शिकवला. 1656 साली वारले. इतकंच शिकवलं जातं.

नेहरुंच्या मंत्रिमंडळातून बाबासाहेबांनी राजीनामा का दिला, काय कारण होतं? हे शिकवलं जात का? तर नाही. ज्या तऱ्हेचा कायदा करावा अशी त्यांची इच्छा होती त्या तऱ्हेचा कायदा झाला नाही म्हणून त्यांनी मंत्रिपद सोडलं. मंत्रिपद सोडणं अवघड गोष्ट असते. तत्त्वांसाठी, विचारांसाठी त्यांनी मंत्रिपद सोडलं. बाबासाहेबांनी शिका म्हणून सांगितलं ते फक्त शाळा, कॉलेजांपुरतं मर्यादित नव्हे. शाळा कॉलेजमधली मुलं आणि मुली हे विद्यार्थी आहेत की परिक्षार्थी आहेत?

माझं असं मत आहे की परीक्षार्थी आहेत. म्हणजे कसंतरी करा आणि पास व्हा. मूळ पुस्तक जास्त वाचलं जातं की गाईड जास्त वाचलं जातं, हे पुस्तक विक्रेत्याला एकदा विचारुन बघा. म्हणजे जे पुस्तक वाचा म्हणून सांगितलं जातं, त्या पुस्तकाचा अर्थ सांगणारं दुसरं पुस्तकच अधिक विकलं जातं.

आमच्याकडे महाराष्ट्रात अशी पुस्तकंच आहेत परीक्षेसाठी. ज्याचं नाव आहे अर्ध्या तासात परीक्षेची तयारी. दुसरं पुस्तक.. मोस्ट इम्पोर्टंट क्वेश्नन्स (MOST IMPORTANT QUESTIONS). म्हणजे काय तर घोकंपट्टी करा. बाबासाहेबांनी शिकायला सांगितलं म्हणजे फक्त शाळेत शिकायला सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं जग बघा. जगात काय चाललंय ते बघा. भारतात काय चाललंय ते बघा. गावात, राज्यात काय चाललंय ते बघा. या सगळ्याचं ज्ञान घ्या. म्हणजे शिका.

मी बरीचशी पुस्तकं लिहीतो. पण मी लेखक नाही. हे काहीतरी विचित्र सांगतोय मी असं तुम्हाला वाटेल. म्हणजे असं की मी कार्यकर्ता आहे. आणि कार्य करण्यासाठी पुस्तक लिहावं लागतं. कार्य करण्यासाठी ज्ञान मिळवावं लागतं. जो ज्ञान न मिळवता कार्य करेल, त्याचं कार्य यशस्वी होणार नाही. म्हणून आपल्याला सगळ्या जगाचं ज्ञान मिळवलं पाहिजे. पोट भरण्यासाठी आपण जेवढा खर्च आणि वेळ देतो त्याच्या तुलनेत डोक्यामध्ये ज्ञान भरण्यासाठी आपण खर्च करतो का? याचा विचार करा. मनुष्य आणि जनावर यात फरक काय आहे. खरा फरक काय आहे, तर माणसाचा मेंदू जास्त विकसीत झालेला आहे. तो मेंदू आणखी विकसीत करता येतो.

मुद्दा आहे शिकण्याचा. आंबेडकरांचं पुस्तक वाचा. संयोजकांनी रागावू नये. कदाचित त्यांना माझ्या बोलण्याचा राग येईल. माझ्या गावात आणि महाराष्ट्रात आंबेडकर जयंतीला भाषण द्यायला बरेच लोक बोलवतात. गोव्यात प्रथमच बोलायला बोलवंय. पण आंबेडकर जयंतीच्या सभेत मी बसतो. भाषण करतो. आणि मुळात मी मास्तर असल्यामुळे भाषण करता करता.. मी मध्येच विचारतो डॉक्टर आंबेडकरांचा फोटो ज्यांच्या घरामध्ये आहे, त्यांनी हात वर करा. जवळजवळ सर्व सभा हात वर करते. नंतर मी प्रश्न विचारतो डॉक्टर बाबासाहेबांची मूर्ती पुतळा कुणाकुणाच्या घरात आहे, त्यांनी हात वर करा. निम्मे लोक हात वर करतात. नंतर मी प्रश्न विचारतो, की बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक कुणाकुणाच्या घरात आहे, त्यांनी हात वर करा.. आता हात वर करणाऱ्यांची संख्या अगदी नगण्य असते.

नंतर शेवटचा प्रश्न विचारतो. बाबासाहेब आंबेडकरांनी असंख्य पुस्तकं लिहिलीत. त्यांचं एकतरी पुस्तक पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत मनापासून ज्यांनी वाचलं असेल, त्यांनी हात वर करावेत. जवळजवळ कुणीही हात वर करत नाही. व्यासपिठावर बसलेल्या माणसांकडेसुद्धा मी पाहतो ते सुद्धा वर बघण्याच्या ऐवजी खाली बघत असतात. (सगळेच मोठ्याने हसतात)

हे मी कशासाठी सांगितलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ऐका ना. तो विचार करा ना. शिका म्हणजे काय शिका? तसं आजच्या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने एवढंच मला सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे किमान एकतरी पुस्तक मी पूर्णपणे वाचेन, अशी प्रतिज्ञा करणं म्हणजे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं.

हार घालायचा. चांगलंय. गुलाल उधळायचा. चांगलंय. मेणबत्ती लावायची. चांगलंय. पण याहून चांगलं काय आहे? बाबासाहेबांचं पुस्तक वाचणं, हे शिकणं चांगलंय. बाबासाहेबांचा दुसरा संदेश काय?

संघटीत व्हा. म्हणजे नेमकं कुणी संघटीत व्हायचं. ज्यांच्यावर अन्याय होतो ते संघटीत व्हा. तुम्ही एकटे एकटे अन्याय दूर करु शकणार नाही. यासाठी ज्यांच्यावर अन्याय होतो ते एकत्र या. जे अन्याय करतात ते आणि ज्यांच्यावर अन्याय होतो ते यांची एकजूट होईल का? आपण करताना पाहतो, म्हणून मला राग येतो. मराठीत एक म्हण आहे, हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या पाठी. म्हणजे प्रेम करता करता ती लांडग्याच्याच प्रेमात पडली. लांडग्यावर प्रेम केल्यावर तिच्या प्रेमाचं काय होणार आहे, हे तुम्ही जाणताच. सांगायचा मुद्दा हा की एकजूट करा. असे संघटीत झालात तरच तुम्ही अन्याय दूर करु शकला.

जगात ज्यांच्या ज्ञानाला तोड नाही असा मनुष्य सांगतोय… की एकत्र या. दलितांची, मागासलेल्यांची एकजूट त्यांनी केली, शिक्षणाची बंदी असणाऱ्यांना शिक्षण दिलं. आपल्या देशात शिकायची बंदी होती. तुमची जात काय.. अमकी अमकी.. तुम्ही शिकायचं नाही. तुम्ही कोण? आम्ही मुलगी आहोत. मग तुम्ही शिकायचं नाही. कारण का तर तुम्ही शिकायची लायकी नाही, असं बिंबवलं जायचं. हे पुराण काळापासून चालत आलंय. अजूनही त्याचा अवशेष शिल्लक आहे.

महाभारतामध्ये कौरव-पांडवांचे गुरु द्रोणाचार्य त्यांना धर्नुविद्या शिकवत होते. कर्ण त्यांच्याकडे विद्या मागायला गेला. द्रोणाचार्यांनी सांगितलं, की तू कोळ्याचा मुलगा आहेस. कारण कर्ण जन्माला आल्यानंतर कुंतीनं त्याला पाण्यात सोडून दिला होता. कुमारी माता म्हणून तो जन्माला आल्यामुळे त्याला सोडून दिलं होतं कुंतीने. पुढे राधेनं त्याला सांभाळलं. एका कोळी कुटुंबात तो मोठा झाला. त्याची ओळख हा कोळ्याचा मुलगा अशीच होती. द्रोणाचार्यांनी सांगितलं की तू ज्या जातीत जन्माला आला आहेस, त्याच्यात शिकवता येत नाही. मी तुला शिकवणार नाही. महाभारतामधली ही कथा काय सांगते?

त्या काळात क्षुद्रांना, हरीजनांना, मागासलेल्यांना महार-मांगांना , महार मांग असंच म्हणायचे. पुढे महात्मा गांधींना असं वाटलं की हे नाव चांगलं नाही. म्हणून त्यांनी त्याला एक नाव दिवं. हे नाव होतं हरिजन. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हरिजन हा शब्द आवडत नव्हता. हरिजन म्हणजे देवाचे पुत्र. देवाची माणसं. बाबासाहेब असं म्हणाले की आम्ही जर हरिजन आहोत, तर बाकीचे कोण आहेत? हरिजनांमध्ये एक दया करण्याचा, कीव करण्याचा वास आहे. आमच्यावर तुम्ही दया नका करु. त्याच्यानंतर मग त्याला अलिकडे दलित म्हणतात. अर्थ तोच आहे. त्याच्या पलिकडे आता काय म्हणायला लागले, सरकारच्या समृद्धीमुळे..बीसी.. ओबीसी, एनटी, वीजेटीआय.

कामगार-मालक संयुक्त संघटना असं होईल का कुठं? ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांनी एकत्र यावं. ज्यांना गुलाम म्हणून वागवलं जातं, त्यांनी एकत्र यावं. तरच गुलामीविरोधात बंड पुकारता येईल.

तिसरा शब्द आहे संघर्ष.. संघर्ष करा म्हणजे काय? बाबासाहेबांनी सांगितलेल्या ३ शब्दांपैकी संघर्ष हा सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे. संघर्ष केल्याखेरीज अन्याय दूर होणार नाही. संघर्षाला पर्याय नाही. जीवन म्हणजेच संघर्ष. संघर्षा केल्याशिवाय काहीच निर्माण करता येत नाही. कृती केल्याशिवाय काही नाही.

सामान्य माणसं म्हणतात, संघर्ष करायचा म्हणजे, घेराव बिराव घालायाचा, मोर्चा काढायचा, असलं काही करु नका. गुण्या-गोविंदानं वागावं. आणि हा उपदेश कुणाला करतात? शेळ्यांनाच करतात. अन्याय झालेल्यांनाच संघर्ष न करण्याचं सांगतात. म्हणजे वाघाला शेळी खाऊ दे. पण जर खाल्लं असेल तर एवढ रागवायचं काही कारण नाही. मुद्दा समजावा म्हणून गमतीनं सांगतोय.

तुम्ही जर टीव्हीवर जीओग्राफी किंवा डिस्कवरी चॅनेल पहात असाल, तर असं दिसतं की गायींचा कळप एकत्र येतो, तेव्हा ते वाघाला सुद्धा पळवून लावतात. एक-एकेटा मनुष्य हा दुर्बल असतो. पण 10 जण जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्याला संघर्ष करण्याची शक्ती मिळते. त्यामुळे संघर्ष करायला घाबरु नका.

आपल्या देशामध्ये 2005-2010 या पाच वर्षात पावणे 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. का आत्महत्या केल्या? घेतलेलं कर्ज फेडू शकत नाही, म्हणून आत्महत्या केल्या. मग ज्याला आत्महत्या करण्याची वेळ आली, ज्याच्या मुलाबाळांना खायला मिळत नाही, ज्याची मुलं नीट जेवू शकत नाही, अशा बापानं दगड घेतला. मारला. आणि कुणाचं डोकं फुटलं, तर शहाणे लोकं काय सांगतात? असं करायचं नाही. दगड मारायचा नाही. डोकं फोडायचं नाही. रक्त सांडायचं नाही. गुण्या गोविंदानं घ्यायचं. संघर्ष करायचा नाही. समजुतीनं घ्या. समझोत्यानं घ्या.
समजुतीनं घेईपर्यंत मरायला लागला ना तो! मरा पण संघष करु नका, असं करुन चालेल का? चालणार नाही. जगात मागून काही मिळत नाही. संघर्षाला पर्याय नाही. म्हणून डॉ. आंबेडकरांनी शिका. संघटीत व्हा आणि संघर्ष करा.

रेल्वेच्या कामगारांसमोर भाषण करताना बाबासाहेबांनी दोन शत्रू सांगितले होते. ते म्हणाले एक ब्राम्हणशाही आणि एक भांडवलशाही . सामाजिक विषमता लादणारे आणि आर्थिक विषमता लादणारे असे दोन शत्रू आहे. या दोन शत्रूंविरोधात लढलं पाहिजे. माझं असं मत आहे, हे शत्रू आजही आपले शत्रू आहेत. तुमच्यापैकी कुणाला माझं म्हणणं आवडलं नाही, तर नाही आवडलं. माझं काहीच म्हणणं नाही. हे पाहा तुम्हाला आवडेल ते बोलायचं, असं काही माझं मत नाही. खरं असेल ते बोलायचं. 1938 साली बाबासाहेब आंबेडकर रेल्वे कामगारांसमोर त्यांनी दे दोन शत्रू सांगितले. ब्राम्हणशाहीनं लादलेली सामाजिक विषमता आणि भांडवलशाहीनं लादलेली आर्थिक विषमता, त्यासोबतच स्त्री पुरुष विषमता या तिन्ही विषमतांच्या विरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन, शहाणं होऊन संघर्ष केला पाहिजे.

जाता जाता काहीतरी घेऊन जा. मी काही वर्ष मास्तर होतो. त्यामुळे पाठ शिकवून झाला की उजळणी घ्यायची रक्तात भिनलंय. सर्वात मोठं हत्यार ज्ञान आहे. बाबासाहेबांचे सर्वात बलशाली शब्द मी तुम्हाला सांगितले. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, हे समजून सांगतिलंय. आणि बाबासाहेबांनी सांगितलेले शत्रू समजावण्याचा प्रयत्न केला. व्याख्यान देणं हे काम सोप्प आहे. कृती करणं अवघड आहे.

गोवा हे जेव्हा केंद्रशासित प्रदेश होता, तेव्हा दलितांचं आरक्षण 15 टक्के होते. आता ते 15 वरुन 2 टक्क्यांवर आलंय. असं का झालं? य़ावर अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी संघटीत झालं पाहिजे. आणि त्यासाठी संघर्ष केला पाहिजे.

Source – Youtube

हेही इंटरेस्टिंग आहे...

एक एक करुन अनेक गोष्टी करा. आणि मग एकदा मरा!

एक एक करुन अनेक गोष्टी करा. आणि मग एकदा मरा!

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

जेव्हा सोनाली बेंद्रे राज ठाकरेंसोबत एअरपोर्टवर जाते…

भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

भाऊ तोरसेकर… प्रतिपक्ष की पक्षपाती?

चव्हाण ते ठाकरे! कुणीकुणी भूषवलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद?

चव्हाण ते ठाकरे! कुणीकुणी भूषवलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद?

No Comment

Leave a Reply