तू मनसेचे ऐलान #प्रिये… मी सावध धनुष्यबाण #प्रिये

तू मनसेचे ऐलान #प्रिये… मी सावध धनुष्यबाण #प्रिये

साल असेल 2017 किंवा 18. या वर्षादरम्यान अनेक हॅशटॅग ट्रेन्ड झाले. त्यात सगळ्यात गाजला तो हॅशटॅक प्रिये. कुठून आला होता हा ट्रेन्ड आणि काय आहे त्याच्यामागची गोष्ट?

टीम रिडर – नारायण पुरी. औरंगाबादेतला एक तरुण कवी आहे. त्यांची एक कविता आहे. माफ करा. त्यांच्या अनेक कविता आहे. पण त्यातली एक कविचा खूपच जास्त गाजली. ग्रामीण भाषेचा, खासकरुन मराठवाड्यातले शब्दांची गुंफण असलेल्या रचना, हे त्यांच्या कवितेचा यूएसपी आहे. विनोदी, खोचक, सामाजिक आशय असणाऱ्या अशा सगळ्या गोष्टी एकाच रचनते फार कमी जणांना गुंतता येतात. नारायण पुरी त्यापैकीच एक आहेत.

प्रिये नावाचा एक ट्रेन्ड फेसबूक आणि ट्वीटरवर तुफान चालला. त्याच्या बातम्यासुद्धा झाल्या. हा ट्रेन्ट मुळातच आला तो त्यांच्या एका कवितेमुळे. या कवितेचं ना प्रेमाचा जांगडगुत्ता. ही कविता फेसबूक ट्रेन्ट झालेल्या शेकडो पोस्टपेक्षा कितीतरी उजवी आहे. एकदा वाचून बघाच..

प्रेमाचा झांगडगुत्ता गं

प्रेमाचा जांगडगुत्ता गं
जीव झाला हा खलबत्ता गं
उखळात खुपसले तोंड प्रिये
मुसळाचा तुंबळ रट्टा गं

तू लाजाळूपरी कोमल गं
मी झुंझूर्डाचे झुडूप प्रिये
तू तुळशीवानी सत्वशील
मी आग्याबोंड वेताळ प्रिये
तू विडा रंगीला ताराचा
मी रसवंतीचा चोथा गं
प्रेमाचा जांगडगुत्ता गं
जीव झाला हा खलबत्ता गं

तू पखवाजाचा भक्तीनाद
मी कडकड घाई हलगीची
तू वीणा हरीच्या हाताची
मी तूणतूण तार तुणतुण्याची
तू आषाढवारी अभंग गं
मी परमीट रुमचा जत्था गं
प्रेमाचा जांगडगुत्ता गं
जीव झाला हा खलबत्ता गं

तू सूप चाय नीज चटकदार
मी झेडपीची फुगडी खिचडी
तू बटरनान तंदूर गरम
मी हायब्रीड भाकर धांडाडी
तू पनीर कोफ्ता काजू करी
मी हिरव्या मिरचीचा ठेचा गं
प्रेमाचा जांगडगुत्ता गं
जीव झाला हा खलबत्ता गं

तू काळी नागीण सळसळती
मी म्हांडूळाची चाल प्रिये
एसी गाडीने फिरशी तू
मी टमटमने बेहाल प्रिये
तू नॅशनल हायवे चौपदरी
मी खड्डा कम रस्ता गं
प्रेमाचा जांगडगुत्ता गं
जीव झाला हा खलबत्ता गं

तू मनसेचे ऐलान प्रिये
मी सावध धनुष्यबाण प्रिये
मी वेळ हातावर आलेली
तू कमळापरी बेहान प्रिये
तू सत्ताधारी माजोरी
मी हताशलेली जनता गं
प्रेमाचा जांगडगुत्ता गं
जीव झाला हा खलबत्ता गं

तू गावगडीचा उंच महल
मी गावकुसाचा पाल प्रिये
तू पुरे डाल नी डौलाची
मी भटकी विमुक्त चाल प्रिये
तू नकाशात अन यादीतही
अन् माझा गायब पत्ता गं
प्रेमाचा जांगडगुत्ता गं
जीव झाला हा खलबत्ता गं

तू साधू मन की बात प्रिये
मी बेकारांचा आकांत प्रिये
तू विदेश वाऱ्या हॉलिडेज
माझी जगण्याची भ्रांत प्रिये
तू फेकू गूळ कोपराला
मी बीपीएलचा कित्ती गं
प्रेमाचा जांगडगुत्ता गं
जीव झाला हा खलबत्ता गं

तू अच्छे दिनचा आभास प्रिये
मी आत्महत्येचा फास प्रिये
मी दुबार पेरणी जीवघेणी
तू पिकवीम्याची बॉस प्रिये
मी मराठवाडा दुष्काळी
अन् तू सत्तेचा रट्टा गं
प्रेमाचा जांगडगुत्ता गं
जीव झाला हा खलबत्ता गं

तू ब्लॅकमनी स्वीस बँकेतील
मी खाली तिजोरी देशाची
तू अटल पेन्शन वा जनधन
कर वसुली माझ्या मासाची
तू मूसोलिनी, हिटलरवादी
मी देशाचा फुटका माथा गं
प्रेमाचा जांगडगुत्ता गं
जीव झाला हा खलबत्ता गं

तू नामांतर तू विषयांतर
मी दंगलीमध्ये होतो अमर
मी व्यापमची मर्डर मिस्ट्री
तू देशभक्तीचे अवडंबर
मी पानसरे मी दाभोळकर
तू स्वातंत्र्याचा बोभाटा गं
प्रेमाचा जांगडगुत्ता गं
जीव झाला हा खलबत्ता गं

आटपाटी नाईट्स या सिनेमात नारायण पुरींच्या या वायरल कवितेच्या दोन ओळी वापरुन गाणं तयार करण्यात आलंय. हे गाणंही चांगलंय. तुम्ही खाली लिंकवर पाहू शकता. पण त्याहीपेक्षा नारायण पुरी यांची अस्सल मराठवाडा बाज असणारी काटा ही कविता जास्त चांगली आणि आवर्जून वाचावी अशी आहे.

गाण बघताना कंटाळा आला, तर ही कविता खूपच जबरदस्त आहे. खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही ही कविता नारायण पुरींच्याच आवाजात ऐकूही शकता.

पायामंदी सालतो गं..
सखे बोराटीचा काटा
तुह्या पायातही सलत्यात
माहा निम्मा वाटा


पाय नाजूक साजूक
राणी कापसाच्या वानी
तुह्या पायाला भुलली
बघ काट्याची गं आनी


काट्यानेच काटा काढू
जरा होईल गं इजा
राणी काट्याला मी देतो
काट्यानेच सजा

अशी लंगडू नकोस
घडीभर बस राणी
मुचकुनी काट्यानं गं
झाली गाजराच्या वानी

तुहा मखमाली पाय
मांडीवर ठेव जरा..
थुक्का लावतो बोटानं
पाय करतो साजरा

नको आईचा गजर
आई तुही माहेरात
सखे शेजारी पाजारी
येगळाच बघतात

बघ निघाला का काटा
धर तळहातामंदी
पापणीच्या केसानं गं
त्याला कर जायबंदी

बघ मुचकुनी काटा
केलं दोघाला बेजार
रोज मोडावेत तुला
काटे हजार हजार

तू गं नाजूक हरणी
देतो बिब्याचा फणका
दृष्ट लागणार नाही
नाही हुरुपाचा धोका

जरा जपून चालावं
बऱ्या नसतात वाटा
बाई टपून असतो
वाट वाटेवर काटा

हेही इंटरेस्टिंग आहे...

26 जुलै | धडकी भरवणारी तारीख आहे कारण…

26 जुलै | धडकी भरवणारी तारीख आहे कारण…

मटकीला मोड नाय, 2.8 किमीच्या शेषनाग मालगाडीला तोड नाय

मटकीला मोड नाय, 2.8 किमीच्या शेषनाग मालगाडीला तोड नाय

प्रमोद महाजनांची मर्डर मिस्ट्री सस्पेन्स थ्रिलरपेक्षा कमी नाही!

प्रमोद महाजनांची मर्डर मिस्ट्री सस्पेन्स थ्रिलरपेक्षा कमी नाही!

No Comment

Leave a Reply