वडापाव विकून 300 कोटीचा धंदा करणारा अवलिया

वडापाव विकून 300 कोटीचा धंदा करणारा अवलिया

नोकरीचा कंटाळा आला म्हणून काहीही करेन, वेळ पडल्यास वडापावची गाडी टाकेन असं म्हणणारे खूप पाहिले असतील. पण एका मद्राशाने तर चक्क वडापाव विकून कोट्यवधींचा धंदा उभा केला. कित्येकांना रोजगार उपलब्ध करुन दिला. महत्त्वाचं म्हणजे सामान्य वडापावला ग्लोबल ब्रॅन्डही बनवलं.

गोष्ट आहे 2003-2004 साला दरम्यान. वीटी स्टेशनच्या बाहेर मॅकडोनल्डचा मोठा बॅनर लागला होता. तो बॅनर पाहून एक माणसाला प्रश्न पडला. जर विदेशातील बर्गर आपल्याकडे इतका प्रसिद्ध होऊ शकतो, तर मग आपला स्वदेशी वडापाव का नाही? हा प्रश्न ज्या माणसाला पडला, त्याचं नाव होतं व्येंकटेश अय्यर. थोड्याच दिवसांत व्येंकटेश अय्यर यांनी वडापावला मोठा ब्रॅन्ड बनवण्याचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न केले आणि अल्पावधीतच गोली वडापाव हा ब्रॅन्ड तयार झाला.

गोली वडापावचे व्यंकटेश अय्यर सांगतात, की मी एका हातात बर्गर धरला आणि दुसऱ्या हातात वडपाव घेतला. मला ते दोन्ही जुळे भाऊ वाटले.

20 वर्ष इनवेस्टमेन्ट बँकींगचा व्यवसाय करणाऱ्या व्येंकटेश अय्यर यांना पहिल्यापासूनच काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. अनेक कल्पना त्यांच्या डोक्यात येत होत्या. पण नेमकं करायचं काय?, हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. खवय्ये असल्यानं त्यांनी त्याच क्षेत्रात काहीतरी करुन दाखवायचं असं ठरवलं. मात्र तरीही काय बनवायचं आणि काय विकायचं, याबद्दल त्यांना काहीच सुचत नव्हतं. फास्ट फूड आणि चायनीचचा पर्याय त्यांच्यासमोर होता. पण त्यांना देशी चव असणारा पदार्थ विकायचा होता. त्यातही तो पदार्थ पटकन बनेल, पटकन खाता येईल, असा असायला हवा होता.

इडली-डोसा म्हटलं, तर त्यात सांबार चटणी आली. सांभार-चटणी म्हटलं की प्लेट आणि चमचे आले. प्लेट आणि चमचे म्हटलं की टेबल आणि खूर्चीही आली. या सगळ्यामुळे कॉस्ट ऑफ बिझनेस वाढणार, हे ध्यानात घेऊन त्यांनी इडली-डोसाचा पर्याय सोडून दिला. पण जेव्हा वीटी स्टेशनच्या बाहेर त्यांनी मॅकडॉनल्डचा मोठा बॅनर पाहिला, तेव्हा त्यांनी वडापावच विकायचं, हे ठरवून टाकलं.

व्येंकटेश अय्यर, गोली वडापावचे सर्वेसर्वा

व्येंकटेश अय्यर सांगतात की, मला आणि माझ्या पार्टरनला वडापाव खूपच आकर्षित करत होता. कारण एक तर तो खाणं सोप्प आहे. तो खाण्यासाठी ना चमचे लागत आणि नाही प्लेट. त्यामुळे वडापाव विकणंही सोप्पं आहे. त्यात फारशी झंझट नाही. शिवाय वडापाव पटकन तयारही होतो. पटकन खाताही येतो, पटकन पोटही भरतं, आणि पटकन तुम्हाला अनेकजणांना तो विकणंही जास्त सोप्प आणि शक्य आहे. त्यामुळे मुंबईच्या फुटपाथवर किंवा रेल्वेस्टेशनवर विकल्या जाणाऱ्या वडापावला ग्लोबल लूक द्यायचं आम्ही ठरवलं, आणि कामाला लागलो.

गोली वडापाव नाव का ठेवलं?

आपल्या प्रॉडक्टचं नाव सगळ्यांना लक्षात राहण्यासारखं असलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. अय्यर यांनाही ते वाटतच होतं. त्यांच्या मित्रांनी त्यांना अनेक इंग्रजी नावं सुचवली होती. पण अय्यर यांना देशीच नाव हवं होतं. त्यात बॉलिवूड सिनेमांचाही त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. मुंबईच्या भाषेतली रापचिक, आयटम यांसारखे शब्द त्यांना आवडले होते. अनेक नावांचा विचार केल्यानंतर त्यांच्या डोक्यात गोली हे नाव फिक्स झालं होतं. ‘अब मेरी गोली खाने को तैयार हो जाओ’, ‘गोली तो खानी पडेगी’, अशा डायलॉग्समधून त्यांना गोली हे नाव सुचलं. गोली वडापावच्या वेबसाईटवरही ‘अब… गोली खा’ अशी टॅगलाईन आहे.

भारतात फूड बिझनेस करणं वाटतं तितकं सोपं नाही. इनवेस्टमेन्ट बँकिग बिझनेसमधून त्यांनी अनेकांचा धंदा मोठा करण्यात मदत केली पण अय्यर यांना मात्र खूप स्ट्रगल करावं लागलं. तीन वेळा त्यांना धंद्यात मोठा फटका बसलाय. पण त्यांनी हार मानली नाही. गोरेगावच्या आरे मिल कॉलनीतील वडापाव स्टॉल लावण्याच्या प्रकरणाला राजकीय वळणही लागलं. त्यात त्यांचं तब्बल 5 कोटी रुपयांचं नुकसान झालं. पण ते मागे हटले नाहीत. त्यांनी ध्येय सोडलं नाही. खरंतर यानंतही ते प्रामाणिकपणे आपलं स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी झटत राहिले. आरे मिल कॉलनीतील वडापाव स्टॉल प्रकरणानंतर गोली वडापाव मीडियामध्ये चर्चिला गेला.

मीडियात चर्चिला गेल्यामुळे एकप्रकारे अय्यर यांना फायदाच झाला. Every Publicity is a good publicity याचा प्रत्यय त्यांना आला. अनेकांनी ई-मेल करत अय्यर यांच्या गोली वडापावची विचारणा केली. 5 कोटीचा तोटा झाल्यानंतर कुणीही धंद्यातून पाय काढायचा विचार करेल. पण अय्यर यांनी संकटालाच संधीत बदललं. कर्ज काढून त्यांनी पुन्हा जोमाने गोली वडापाव उभा केला. देशी वडापावला ग्लोबल टच देणाऱ्या व्येंकटेश अय्यर यांच्यामुळे मुंबईचा वडापाव देशाच्या कानाकोपऱ्यात एक ब्रॅन्ड बनलाय.

मुंबईतून जन्माला आलेला गोली वडापाव बस्ती, गोंडा, बनारल, लखनौ, चंदीगड, धनबाद, जमशेदपूर, रांची, दरभंगा, कर्नाटक, केरळ, कोईंम्बत्तूर, बंगळुरु आणि चेन्नईतही विकला जातोय. इतकंच काय तर मुंबईशिवाय नाशिक, औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर, परभणीतही गोली वडापावची दुकानं आहेत.

अय्यर सांगतात की, वडापाव हा अमिताभ बच्चन सारखा आहे. 70व्या वर्षीही अमिताभ जेव्हा कौन बनेगा करोडपतीसाठी उभं राहतात, तेव्हा ते हिट होतं. तसंच वडापावचंही आहे. वडापाव कोणत्याही काळात हिट आहे. जो कुणी वडापावची गाडी लावेल, तो सहजपणे वडापाव विकू शकतोत. इतकंच काय तर वड्यात वापरला जाणारा बटाट हा तर गोविंदा सारखा आहे. बटाटा कुणाला नाही आवडत. आपल्याकडे बटाटा सगळ्यात असतो. डोसा, समोसा, पराठा सगळ्यात बटाटाच तर वापरता. बटाट्याला वेगवेगळे मसाले लावून, नवी चव तयार करुन आपल्याकडे विकला जातोय.

आपल्या अनोख्या विचारामुळे गोली वडापावचं बिझनेस मॉडेल हार्वर्ड, आईएमडी स्वित्झर्लंड आणि आयएसबी हैदराबाद यांसारख्या बिझनेस शिकवणाऱ्या संस्थांनीही अभ्यासलं आहे. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. माय जर्नी विथ वडापाव नावाचं एक पुस्तकही त्यांनी लिहिलंय. गोली वडापावने जवळपास 2 हजार लोकांना रोजगार दिलाय. त्यांच्या स्वतःच्या कंपनीचे 50 रेस्टॉरंट आहेत. हा आकडा तेजीनं वाढतोय.

पाऊलो कोयलो यांचं एक वाक्य गोली वडापावच्या यशाला चपखल बसतं. पाऊलो कोयलो म्हणतात – जर तुमचं एक स्वप्न आहे, तर ते स्वप्न ब्रम्हांडानेच जन्माला घातलंय. त्यामुळे ते पूर्ण करण्याची जबाबदारीही संपूर्ण ब्रम्हांडाचीच असते. गोली वडापावच्या बाबतीत हेच खरं झालंय, असं व्यंकटेश अय्यर सांगतात.

– गोली वडापावची टाईमलाईन –
2004 साली पहिलं दुकान कल्याणमध्ये सुरु केलं.
भारतातील 21 राज्यात 350हून अधिक दुकानं आहेत.
75पेक्षा जास्त दुकानं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरात आहेत.
गोली वडापावचा धंदा 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त झालाय.

हेही वाचा – इन्फोसिसची नोकरी सोडली आणि पाणीपुरी विकून कमाल केली

हेही वाचा – 2 वर्षांचा असताना वडील गेले, पेन्शनवर शिकला, आज करोडोत खेळतोय
हेही वाचा – खूप श्रीमंत.. खूप खूप श्रीमंत.. आणि मग येतात नाना शंकरशेठ
हेही वाचा – कुठे गाडी लावू? उबर की ओला? | धंदा एके धंदा

हेही इंटरेस्टिंग आहे...

2 वर्षांचा असताना वडील गेले, पेन्शनवर शिकला, आज करोडोत खेळतोय

2 वर्षांचा असताना वडील गेले, पेन्शनवर शिकला, आज करोडोत खेळतोय

इन्फोसिसची नोकरी सोडली आणि पाणीपुरी विकून कमाल केली

इन्फोसिसची नोकरी सोडली आणि पाणीपुरी विकून कमाल केली

‘एक वेळ अशीही आली की वाटलं एक्टींग सोडून द्यावी’

‘एक वेळ अशीही आली की वाटलं एक्टींग सोडून द्यावी’

प्रेम नहीं है खेल प्रिये, तू ‘कमळा’परी बेभान प्रिये

प्रेम नहीं है खेल प्रिये, तू ‘कमळा’परी बेभान प्रिये

No Comment

Leave a Reply